गोवंश कायद्याने शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात
By admin | Published: July 30, 2016 12:59 AM2016-07-30T00:59:19+5:302016-07-30T00:59:19+5:30
राज्य शासनाने गोवंश हत्त्याबंदीचा कायदा केल्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे,
रघुनाथदादा पाटील : पुसद येथील बैठकीत सरकारवर टीका
पुसद : राज्य शासनाने गोवंश हत्त्याबंदीचा कायदा केल्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे, अशी जोरदार टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली.
गुरुवारी २८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक विश्रामगृहात आयोजित शेतकरी संघटना व कुरेशी समाज संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की, सरकारने गोवंश हत्त्याबंदी वन्यजीव संरक्षण कायदा करून शेतकरी उद्ध्वस्त केले आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नगदी पशुधन असलेले बैल, म्हैस, गाय अशा जनावरांना खरेदीदार उरलेला नाही. भाकड जनावरांचे काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कुरेशी समाजाच्या हातांना काम न राहिल्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बैठकीच्या आयोजनामागची भूमिका विषद करताना शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दिनकर दाभाडे म्हणाले की, भाजप सरकार जनतेचे व्यवसाय स्वातंत्र्य हिसकावून घेवून त्यांच्यावर खाण्यापिण्यापासून बंधने आणत आहे. ९ आॅगस्ट रोजी अमरावती विभागीय कार्यालयावर आयोजित मोर्चा व धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
गोवंश हत्त्याबंदी कायद्याकडे भावनात्मकदृष्टीने न पाहता अर्थकारणाच्या दृष्टीने पाहावे, असे संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे म्हणाले.
पशुधन बाजारात विकलेच जात नसेल तर शेतकरी त्यांची पैदास तरी कशाला करेल? त्यामुळे देशातील पशुधन घटण्याचा धोका निर्माण होणार आहे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड.सुभाष खंडागळे होते. संजय पौगाळे, गफ्फार कुरेशी आदींसह शेकडो शेतकरी कुरेशी, समाजाचे लोक उपस्थित होते. रघुनाथदादा पाटील, कालिदास आपटे, दिनकर दाभाडे यांचा कुरेशी समाज संघटनेच्यावतीने यावेळी सत्कार करण्यात आला.
(तालुका प्रतिनिधी)