शेतकरी आत्महत्या विकासाचा पराभव
By admin | Published: March 20, 2016 02:22 AM2016-03-20T02:22:11+5:302016-03-20T02:22:11+5:30
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर हमीभाव मिळत नाही. म्हणूनच मी माझ्या अध्यक्षीय भाषणात सहा पाने शेतकऱ्यांसंदर्भात ...
श्रीपाल सबनीस : माणूसदरी येथे कृषी साहित्य संमेलनाचा समारोप
घाटंजी : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर हमीभाव मिळत नाही. म्हणूनच मी माझ्या अध्यक्षीय भाषणात सहा पाने शेतकऱ्यांसंदर्भात लिहिली. भारतातील शेतकऱ्यांसाठी अॅग्रीकल्चरची स्थापना केली पाहिजे, लवाद निर्माण केला पाहिजे, ही मागणी आपण केली आहे. नागरिकांनीही ती करावी. सदर मागणी मंजूर झाल्यास भारतात क्रांती होईल, शेतकरी सुखी होईल. होत असलेल्या शेतकरी आत्महत्या संस्कृतीचा, विकासाचा पराभव करणाऱ्या आहे, इथल्या कार्यकर्त्यांचा, राजकीय, सामाजिक नेतृत्वाचा पराभव आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
माणूसदरी येथील फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर संमेलनाध्यक्ष मोतीराम कटारे, स्वागताध्यक्ष देवानंद पवार, न.मा. जोशी, गंधे, प्रा. माधवराव सरकुंडे, बळी खैरे, हेमंत कांबळे, प्रशांत वंजारे, नगराध्यक्ष चंद्ररेखा रामटेके, शैलेश इंगोले, नागेश गोरख, प्रा. वंजारी, साहेबराव पवार आदी उपस्थित होते.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या घामातून मोती पिकत असलेल्या या मातीमध्ये हे संमेलन होत आहे. या ऐतिहासिक संमेलनात शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसून टाकण्यासाठी लवाद व अॅग्रीकल्चरची स्थापना उपयुक्त ठरावी. महात्मा फुले यांचे कर्तृत्व साऱ्या जगाला माहीत आहे, ते वंदनीय आहे. बाबासाहेब आंबेडकरांचेही कर्तृत्व जगवंदे आहे. कृषी आणि साहित्य या दोन संकल्पना एकत्र आणण्याचा योग, प्रयत्न आणि कार्य माणूसदरी गावाने सिद्ध केले असल्याचे त्यांनी सांगितले. पालखीमध्ये डॉ. बाबासाहेबांचे संविधान आणि ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हे महात्मा फुले यांचे पुस्तक ठेवलं आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे. इतरांचेही साहित्य पालखीमध्ये असायला पहिजे होते, असे ते म्हणाले.
स्वागताध्यक्ष देवानंद पवार यांनी काही ठराव या संमेलनात मांडले. ते आवाजी मताने मंजूर झाले. यावेळी २५ प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. १० शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आठवीची विद्यार्थिनी प्रणौती पांडुरंग निवल हिच्या ‘उमलनाचे नवतरंग’ या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. संचालन साहेबराव पवार, आभार हेमंत कांबळे यांनी मानले. या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन, परिसंवाद आणि सत्यपाल महाराजांचा प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. (तालुका प्रतिनिधी)