नागापूर येथील शेतकऱ्याचा उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:41 AM2021-04-08T04:41:25+5:302021-04-08T04:41:25+5:30
उमरखेड येथील स्वामी चिन्मयानंद महाराज या संस्थानच्या कुपटी शिवारात असलेल्या शेत सर्वे नं. ७१ क्षेत्रफळ ५ हे ४५ ...
उमरखेड येथील स्वामी चिन्मयानंद महाराज या संस्थानच्या कुपटी शिवारात असलेल्या शेत सर्वे नं. ७१ क्षेत्रफळ ५ हे ४५ आर या जमिनीवर मागील ५० ते ६० वर्षांपासून आडे यांचा ताबा आहे. या जमिनीवर वडिलोपार्जित वहिती करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गणेश आत्माराम आडे यांच्या ताब्यातील या जमिनीचा काही खडकाळ भाग असल्यामुळे तो पडित आहे. त्याचा लाभ घेत नागापूर येथील सरपंच व सचिव यांनी कायदेशीर सोपस्कार पार न पाडता ताबा कसला. पदाच्या बळावर त्यांनी सहमती न घेता व माहिती न सांगता गाव विकासाच्या दृष्टीने काम करण्याच्या हेतूने त्या जागेवर तार कंपाऊंडचे बांधकाम केले.
यामुळे आडे यांना वहितीच्या जमिनीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. परिणामी संबंधित सरपंच व सचिव यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी अन्यथा १ मे पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गणेश आडे यांनी दिला आहे. संबंधित जमीन मामल्यात अधिक माहिती अवगत झाली नसून याविषयी माहिती मिळवून लवकरच आदेश देऊ, अशी माहिती नागापूरचे (प) प्रभारी सचिव जी.के. गोरे यांनी सांगितले.