निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 AM2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:21+5:30

मोजक्या क्षेत्रातील सोयाबीनची काढणी झाली आहे. या ठिकाणी अ‍ॅव्हरेज घटला आहे. प्रारंभीचाच अ‍ॅव्हरेज घटल्याने मागाहून झालेल्या पेरणी क्षेत्रात उत्पन्नच येणार किंवा नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना ८ ते १० क्विंटलचा सरासरी अ‍ॅव्हरेज आला. यावर्षी जिल्ह्यात शेतकऱ्यांना दोन ते सात क्विंटलपर्यंतच अ‍ॅव्हरेज आला आहे. हा अ‍ॅव्हरेज एकरात चार ते पाच क्विंटलने घटला आहे. यानंतरही शेतमालास भाव नाही, अशी संपूर्ण परिस्थिती आहे.

Farmers neglected in the throes of elections | निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी दुर्लक्षित

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी दुर्लक्षित

Next
ठळक मुद्देसोयाबीनला उताराच नाही : बिना दाण्याच्या शेंगा, एकरी दोन क्विंटलचेही पीक नाही

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उशिरा सुरू झालेला पावसाळा, नंतर झडीस्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे शेती उत्पादन घटण्याची चिन्हे आहे. हाती आलेल्या उत्पादनालाही चांगला भाव मिळेल, अशी चिन्हे दिसत नाही. निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांचे हे सर्व प्रश्न बाजुला फेकले गेले आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. शेतमाल खरेदीसाठीची कुठलीही तयारी नाही. यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रकाशपर्व साजरे करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अल्पावधीत हाती येणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. या पिकावर रब्बीचे नियोजन केले जाते. उधारीवर घेतलेले हातउसने देण्याचा प्रयत्नही केला जातो. मात्र यावर्षी सोयाबीनचा उताराच आला नाही. लागवडीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याचाच धोका आहे.
पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले आहे. मजुरांअभावी अनेकांना सोयाबीन सोंगता आले नाही. तर अनेक शेतकºयांना परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. काही मोजक्या क्षेत्रातील सोयाबीनची काढणी झाली आहे. या ठिकाणी अ‍ॅव्हरेज घटला आहे. प्रारंभीचाच अ‍ॅव्हरेज घटल्याने मागाहून झालेल्या पेरणी क्षेत्रात उत्पन्नच येणार किंवा नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना ८ ते १० क्विंटलचा सरासरी अ‍ॅव्हरेज आला. यावर्षी जिल्ह्यात शेतकऱ्यांना दोन ते सात क्विंटलपर्यंतच अ‍ॅव्हरेज आला आहे. हा अ‍ॅव्हरेज एकरात चार ते पाच क्विंटलने घटला आहे. यानंतरही शेतमालास भाव नाही, अशी संपूर्ण परिस्थिती आहे.

उत्पादन घटण्याची प्रमुख कारणे
जिल्ह्यात यावर्षी दोन लाख ६७ हजार ३४७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. अल्पावधीत हाती येणारे पीक अतिपावसाने क्षमतेपेक्षा अधिक वाढले. यासोबतच गवताचे प्रमाण वाढले. तणनाशकानंतरही हे गवत मेले नाही. यामुळे सोयाबीनला लागलेल्या शेंगा परिपक्व झाल्या नाही. मिरचीचे बी असावे असे सोयाबीनचे दाणे आहेत. तिळ आणि ज्वारीइतके बारीक दाणे तयार झाले आहे. पिकांना हवा असलेला सूर्यप्रकाश मिळाला नाही. किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. उंटअळी, खोडकिडी, पांढरी माशी या प्रकारामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. यातून सोयाबीनचे उत्पादन घटले. काळीच्या जमिनीत क्षमतेपेक्षा अधिक पाणी आले. यातून मुळाची वाढ झाली नाही. त्याला पांढऱ्या गाठी पकडल्या नाही. पिकाला ताण बसला नाही. यामुळे शेंगा कसल्या नाही. यातून सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. भरकाच्या जमिनीत काळीच्या जमिनीपेक्षा अधिक उतारा आला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
खर्चालाही परवडेना
यावर्षीचे पीक अतिपावसाने वाया गेले. कापणीनंतर हातात आलेल्या उत्पन्नानंतरच याचे वास्तव उलगडले. अर्धीअधिक शेती चिबडली. येणारे प्रत्येक वर्ष शेतीसाठी अवघड होत चालले आहे. शेती खर्चालाही परवडेनाशी झाली आहे.
- शशांक बेंद्रे 


शेती सोडून रोजमजुरीच करू
घरातले तीन कमावते माणसं शेतात राबराब राबत आहे. त्यांनी शेती सोडून इतर ठिकाणी रोजमजुरी केली तरी प्रत्येकला सहा हजार रूपये महिना पडतो. तिघांना महिन्याकाठी २० हजारनुसार वर्षाला अडीच लाख होतात. मात्र ही मेहनत शेतात केली तर हातात पाच पैसे राहण्याची शाश्वती नाही. उलट कर्ज होत आहे. यामुळे पुढील काळात शेती सोडून रोजमजुरीच करू.
- प्रवीण ठाकरे


दिवाळी अंधारात जाणार
सोयाबीनची काढणी केल्यावर येणाºया पैशातून जुनी परतफेड आणि रब्बीच्या पेरणीचे नियोजन होते. आता एकरी उत्पन्नच घटले आहे. काही भाग तर सोंगावा का नाही असा विचार पडला आहे. अशा स्थितीत दिवाळी तोंडावर आली आहे. ही दिवाळी अंधारात जाईल, अशी आमची अवस्था आहे.
- मनिष जाधव 

उत्पादन घटले, भाव पडले
जे सोयाबीन काढणीला आले. त्याची काढणी करण्यात आली. तर एकूण उत्पादन निम्म्यापेक्षा कमी झाले आहे. हे सोयाबीन बाजारात न्यायचे ठरविले तर बाजारात सोयाबीनचे दर पडले आहे. आधी ३८०० रूपये क्विंटल असलेले सोयाबीन ३५०० पर्यंत खाली घसरले आहे. यामुळे शेतकºयांना दुहेरी नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.
- अनिल लांडगे 

सोयाबीन शेंगा भरल्याच नाही
यावर्षी सोयाबीनची अवस्था भयंकर खराब आहे. एकरी उत्पादन न विचारलेलेच बरे. वरच्या शेंगा भरल्या, मधातल्या शेंगा बारकावल्या आणि खालच्या शेंगामध्ये दाणेच भरले नाही. अशी संपूर्ण अवस्था आहे. यातून उत्पन्न घटले आहे.
- अजय डवले 

Web Title: Farmers neglected in the throes of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी