शेतकऱ्यांची भिस्त आता खरिपातील कपाशी अन् सोयाबीनवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 05:00 AM2022-07-18T05:00:00+5:302022-07-18T05:00:02+5:30

तालुक्यात आत्तापर्यंत ३७ हजार ५८८ हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीच्या पिकाचे आहे. १७ हजार १९१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. केवळ २५७ हेक्टरवरच मुगाची लागवड करण्यात आली. २२५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. २५० हेक्टरवर उडदाची पेरणी करण्यात आली आहे. मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी यावर्षी  तालुक्यात अर्ध्यावर आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कल कपाशी आणि सोयाबीनकडे दिसून येत आहे.

Farmers now focus on cotton and soybeans in Kharipa | शेतकऱ्यांची भिस्त आता खरिपातील कपाशी अन् सोयाबीनवरच

शेतकऱ्यांची भिस्त आता खरिपातील कपाशी अन् सोयाबीनवरच

Next

प्रकाश सातघरे
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यात खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यावेळी पाऊस उशिरा आल्यामुळे  शेतकऱ्यांनी मूग, ज्वारी, उडदाच्या पिकाकडे पाठ फिरविली आहे. आता त्यांची सर्व भिस्त कपाशी आणि सोयाबीनवर अवलंबून आहे.
तालुक्यात आत्तापर्यंत ३७ हजार ५८८ हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीच्या पिकाचे आहे. १७ हजार १९१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. केवळ २५७ हेक्टरवरच मुगाची लागवड करण्यात आली. २२५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. २५० हेक्टरवर उडदाची पेरणी करण्यात आली आहे. मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी यावर्षी  तालुक्यात अर्ध्यावर आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कल कपाशी आणि सोयाबीनकडे दिसून येत आहे. सोयाबीनपेक्षा तब्बल दोन हजार हेक्टर क्षेत्रात जादाची कपाशी लागवड करण्यात आली आहे. 

पावसामुळे मूग, उडीद, ज्वारीचे क्षेत्र घटले
मागीलवर्षी मूग, उडदाची लागवड जास्त करण्यात आली होती. यावर्षी ती  अर्ध्यापेक्षा कमी करण्यात  आली. ज्वारीची लागवड ५०० हेक्टरवर झाली होती. यंदा ती २२५ हेक्टरवर आली आहे. शेतकऱ्यांनी  कापूस आणि सोयाबीनला महत्त्व दिले आहे.

तालुक्यात ९५ टक्के पेरणी पूर्ण
सद्यस्थितीत जवळपास ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली. कपाशी, तूर व सोयाबीन पीक समाधानकारक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशी पिकाचा पेरा वाढलेला दिसतो. पावसाच्या उशिरा आगमनामुळे मूग, उडीद, ज्वारी पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. सोयाबीन पिकाबाबतीत ज्या शेतात पाणी साचत असेल, अशा ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी सरी काढावी.
- अर्जुन जाधव, मंडळ कृषी अधिकारी, दिग्रस

३७ हजार ५८८ हेक्टरवर पेरा
- उशिरा पावसामुळे सुरुवातीला पेरण्या खोळंबल्या होत्या. तालुक्यात खरिपाच्या पेरणीसाठी तयार केलेले क्षेत्रापैकी आत्तापर्यंत ३७ हजार ५८८ हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहे. 
- यावेळी पावसाने दांडी मारल्याने अनेकांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. यामध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. आता जोरदार पाऊस पडत असल्याने अनेकांच्या पिकांना मार बसला आहे. 
- शेतात पाणी जमा झाल्याने पिके पाण्यात सापडली आहे. एकंदरीत यावर्षी शेतकऱ्यांना शेती करताना मोठी कसरत करावी लागत आहे. आता अतिवृष्टीने तडाखा दिल्याने पिके पुन्हा संकटात सापडली आहे. 

शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांना ठराविक काळात पाणी लागते. अनियमित पावसामुळे पिके बरोबर येत नाही. पिकांना जंगली जनावरांचा मोठा त्रास असतो. रानडुक्कर, रोही उभी ज्वारी नेस्तनाबूत करतात. दुसरीकडे मजुरांची कमतरता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे.  सोयाबीन आणि कापसाला भाव चांगले असल्यामुळे यावर्षी या पिकांकडे जादा कल आहे.
- सुभाष राठोड, विठाळा

नगदी पीक म्हणून कापूस, सोयाबीन या पिकाला अधिक महत्त्व दिले जाते. उडीद, मूग आणि ज्वारीला या पिकाला मजूर लागते. ते वेळवर भेटत नाही. त्यामुळे हे पीक घेण्याकडे शेतकरी दुर्लक्ष करते. हे पीक मेहनतीला पुरत नाही. भाव कमी राहतात. त्यामुळे कापूस, सोयाबीनला पसंती दिली आहे.
- शंकर भालेराव, फेटरी

 

Web Title: Farmers now focus on cotton and soybeans in Kharipa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.