शेतकऱ्याची रानडुकराशी झुंज

By admin | Published: November 21, 2015 02:45 AM2015-11-21T02:45:00+5:302015-11-21T02:45:00+5:30

फवारणीसाठी लागणारे पाणी आणण्यासाठी नाल्यावर गेलेल्या एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केला.

Farmer's Rand | शेतकऱ्याची रानडुकराशी झुंज

शेतकऱ्याची रानडुकराशी झुंज

Next

पिंपळखुटीची घटना : दैव बलवत्तर म्हणून वाचला, १५ मिनिटे झटापट
राळेगाव : फवारणीसाठी लागणारे पाणी आणण्यासाठी नाल्यावर गेलेल्या एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केला. मात्र शेतकऱ्याने मोठ्या हिंमतीने हा हल्ला परतवून लावला. तब्बल १५ मिनिटे रानडुकरासोबत झुंज दिली. दैवबलवत्तर म्हणून शेतकरी बचावला. मात्र त्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. त्याच्यावर यवतमाळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
रामकृष्ण आनंदराव झळके (५०) असे रानडुकराशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे ते आपल्या शेतात कामासाठी गेले. फवारणीचे काम सुरू होते. फवारणीसाठी लागणारे पाणी आणण्यासाठी लगतच्या नाल्यावर गेले. त्यावेळी झुडूपात लपून असलेल्या एका रानडुकराने सरळ रामकृष्णवर चाल केली. रामकृष्णला हा प्रकार लक्षात येताच त्याने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र झाडाची फांदी तुटल्याने ते नाल्याच्या पाण्यात कोसळले. त्यावेळी रानडुकराने आपले तीक्ष्ण दात त्यांच्या तोंडावर रोवले. त्याच वेळी जीव मुठीत घेऊन रामकृष्णने रानडुकराचा जबडा पकडला. ही झटापट सुरू असताना रामकृष्ण पाण्यात बुडले. मात्र काही वेळातच ते बाहेर आले. त्यावेळी त्यांनी नाल्यातून मोठी दगड सोबत आणले होते. या दगडांचा त्यांनी रानडुकरावर मारा केला. त्यामुळे रानडुक्कर थोडे बाजूला सरले. नाल्याबाहेर येऊन त्यांनी पुन्हा या रानडुकरावर दगडांचा मारा केला. सुमारे १५ मिनिटे हा प्रकार सुरू होता. अखेर रानडुक्कर जंगलात पळून गेले.
दरम्यान या घटनेची माहिती होताच अनेकांनी नाल्याच्या तीरावर धाव घेतली. रामकृष्णाला जखमी अवस्थेत राळेगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले. या घटनेने रामकृष्ण भयभीत झाला असून दैवबलवत्तर आणि वेळेवर सूचलेल्या युक्तीनेच आपले प्राण वाचले असे तो सांगत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Farmer's Rand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.