शेंबाळपिंपरीत शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:31 AM2021-09-02T05:31:26+5:302021-09-02T05:31:26+5:30
गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा लाभ मिळाला. मात्र, पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा ...
गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा लाभ मिळाला. मात्र, पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हप्ता भरूनही लाभ मिळाला नाही. नुकसानग्रस्त शेतीचे कृषी व महसूल विभागाने पंचनामे केले. नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. तरी विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे विमा कंपनीविरुद्ध बुधवारी सकाळी १० वाजतापासून पुसद ते हिंगोली राज्य रस्त्यावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. नंतर महसूल अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ३० दिवसांत लाभ न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
खंडाळाचे ठाणेदार गोपाल चावडीकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दंगल नियंत्रण पथक पाचारण करण्यात आले होते. आंदोलनात संघर्ष समितीचे अध्यक्ष रामकृष्ण चंदेल, रेणुकादास जोशी, जेनुल सिद्दिकी, माधव मनवर, सदबाराव मोहटे, वसंता चिरमाडे, बापूराव कांबळे, राजेश देशमुख, डॉ. राहुल शिरसाट, राजेश वाहुले, सरपंच रवींद्र महल्ले व परिसरातील शेतकरी सहभागी होते.