शेतकरी घुगऱ्या घेऊन रस्त्यावर
By admin | Published: April 25, 2017 01:04 AM2017-04-25T01:04:47+5:302017-04-25T01:04:47+5:30
नाफेडने तूर खरेदी कायम बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी घुगरी आंदोलन केले.
नाफेडची तूर खरेदी : वीज वितरणसमोर पोलीस आणि शेतकऱ्यात झटापट, घुगऱ्यांचे मडके फुटले
यवतमाळ : नाफेडने तूर खरेदी कायम बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी घुगरी आंदोलन केले. शिजविलेल्या तुरीचे मडके घेऊन जनता दरबारात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी आणि पोलिसांमध्ये वीज वितरण कंपनीसमोर चांगलीच झटापट झाली. यात आंदोलकांनी आणलेले घुगऱ्याचे मडके फुटल्याने शेतकऱ्यांच्याही संयमाचा बांध फुटला. तर तूर खरेदीसंदर्भात प्रशासनासोबत झालेल्या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही.
जिल्ह्यातील बाजार समितीतील नाफेडची तूर खरेदी शनिवार २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली. आजही बाजार समितीत शेकडो क्ंिवटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. परंतु खरेदी होत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने रविवारी घुगरी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार शिजविलेल्या तुरीच्या घुगऱ्या घेऊन शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी पालकमंत्र्यांकडे निघाले. पालकमंत्री मदन येरावार हे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तिकडे मोर्चा वळविला. परंतु पोलिसांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांना अडविले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. दरम्यान झटापट सुरू झाली. यातच शेतकऱ्यांनी आणलेले घुगऱ्याचे मडके फुटले. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला. आंदोलक आणि पोलिसात धक्काबुक्कीही झाली.
दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांचा निरोप पालकमंत्री मदन येरावार यांना दिला. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी जनता दरबारात पोहोचले. या ठिकाणी नाफेडने तूर खरेदी करावी अशी मागणी लावून धरली. यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून काय निर्णय होतो याची माहिती देण्यात येईल, असे पालकमंत्री येरावार यांनी सांगितले.
दरम्यान सोमवारी सकाळी बाजार समितीमध्ये उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख, प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवी, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे बजरंग ठाकरे, तहसीलदार सचिन शेजाळ आणि शेतकरी प्रतिनिधी यांची चर्चा झाली. या बैठकीत नाफेडने तूर खरेदी सुरु करावी, अशी विनंती करण्यात आली. तसे पत्र जिल्हा प्रशासनाच्यावतीने नाफेडच्या प्रतिनिधीला दिले. मात्र नाफेडने तूर खरेदी करण्यास स्पष्ट नकार दिला. पुढील आदेशानंतरच तूर खरेदी सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले होते.
आजच्या आंदोलनात कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, यवतमाळचे रवींद्र ढोक, आर्णीचे राजेंद्र पाटील, बाभूळगावचे नरेंद्र कोंबे, नेरचे रवींद्र राऊत, पांढरकवडाचे प्रकाश मानकर, खविसंचे अध्यक्ष बाळूपाटील दरणे, निखील जैत, महिला संचालक छाया शिर्के यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनामा करण्याचे आदेश
नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर असलेल्या तुरीचे पंचनामे करण्याची मागणी करीत आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. यावेळी तेथे खासदार भावना गवळी यांच्यासह १६ ही बाजार समितीचे सभापती आणि खरेदी विक्रीसंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याची मागणी मान्य करीत संबंधित तहसीलदार व उपनिबंधकांना या संदर्भात सूचना दिल्या.