शेतकरी-शास्त्रज्ञांतील संपर्क, संवादच हरविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 10:18 PM2017-12-20T22:18:21+5:302017-12-20T22:20:11+5:30
महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांच्यात संवादच नसल्याची खंत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. देअर इज टोटल डिसकनेक्ट बिटष्ट्वीन प्रायोरिटीज आॅफ फार्मर्स अँड युनिव्हर्सिटी, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांच्यात संवादच नसल्याची खंत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. देअर इज टोटल डिसकनेक्ट बिटष्ट्वीन प्रायोरिटीज आॅफ फार्मर्स अँड युनिव्हर्सिटी, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत यवतमाळ येथील वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सुसज्ज इमारतीचे लोकार्पण बुधवारी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कुलपती या नात्याने त्यांनी कृषी विद्यापीठांच्या कामगिरीतील त्रृटींवर चपखलपणे बोट ठेवले. ते म्हणाले, शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम आणि कृषी विद्यापीठांच्या प्राधान्यक्रमात साम्य उरलेले नाही. शेतकºयांशी संवाद साधूनच विद्यापीठांनी आपल्या संशोधनाचे प्राधान्यक्रम ठरविले पाहिजे. विद्यापीठाने विशेष पथक निर्माण करून शेतकºयांशी संवाद साधावा. प्रत्यक्ष शेतकºयांकडून त्यांच्या गरजा जाणून घेतल्यावर त्या गरजा भागविणाऱ्या संशोधनालाच प्राधान्य देण्यात यावे. शेतीतील जोखीम, निसर्गाचे धोके कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हेच कृषी विद्यापीठांचे अंतिम ध्येय असले पाहिजे. उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक योग्यप्रकारे वापर कसा करावा, शेतजमिनीचे आरोग्य कसे टिकवावे, उत्पादनाची पद्धत अद्ययावत कशी करावी आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी बोलून दाखविली.
यवतमाळात सुरू झालेले हे महाविद्यालय विदर्भातील पहिले आणि एकमेव कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आहे. येथे कृषी जैवतंत्रज्ञानाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी नक्कीच आपल्या शेतकºयांना परवडणारे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे निर्माण करतील. फवारणीदरम्यान विदर्भात अनेकांचे मृत्यू झाले. आपले विद्यार्थी यावरही नक्कीच उपाय शोधतील, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला.
वातावरणातील बदलाचे शेतीवर, अन्न व्यवस्थेवर आणि ग्रामीण जनजीवनावर विपरित परिणाम होत आहेत. दुष्काळ, महापूर अशा स्वरुपात वातावरणातील बदलांचे दृश्य परिणाम दिसत आहेत. त्याचे शेतीवरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.
यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या विविध प्रयोगांचे मांडले प्रदर्शन
यावेळी महाविद्यालयात कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यात शेतकऱ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना स्थान देण्यात आले होते. वरूडचे (ता. राळेगाव) सुभाषचंद्र ठाकरे आणि त्यांचा मुलगा सौरभ ठाकरे यांनी तयार केलेले स्वयंचलित फवारणी यंत्र लक्षवेधी ठरले. तर बोंडअळीने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले वाण पाहण्यासाठी गर्दी केली. यवतमाळच्या लक्ष्मीनगरातील संदीप लोंदे आणि कुणाल लोंदे यांनी मशरूम शेतीचा प्रयोग प्रदर्शनात ठेवला होता. कॅन्सरवर मात करणाऱ्या वालाची जातही येथे शेतकºयांना बघता आली. अनुदानावरील दालमिल, सबजी कटर यंत्र, सीताफळ आणि त्याचा गर वेगळा करणाºया मशीनसह पॉली हाऊसही प्रदर्शनात ठेवले होते.