शेतकऱ्यांनी आत्मनिर्भरतेसाठी व्यवसायाची कास धरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:46 AM2021-09-27T04:46:09+5:302021-09-27T04:46:09+5:30
फोटो पुसद : विदर्भातील शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर दुग्ध व्यवसायासारख्या शेतीपूरक व्यवसायाची कास धरावी, ...
फोटो
पुसद : विदर्भातील शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर दुग्ध व्यवसायासारख्या शेतीपूरक व्यवसायाची कास धरावी, असे आवाहन नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार संचालक प्रा.डॉ.अनिल भिकाने यांनी केले.
ते साहस येथील दूध संकलन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रशांत वासनिक, शिवाजी माने, प्रदीप बच्चूवार, रंजना गायकी उपस्थित होते. डॉ.भिकाने म्हणाले, शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने पशुपालन करावे, ज्यात दूध व्यवसायाबरोबर शेळीपालन, कुक्कुटपालन व मत्स्य व्यवसायाचा अंतर्भाव करावा. शाश्वत दूध व्यवसायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. हिवरेबाजार व राळेगणसिद्धी या गावांना तीर्थक्षेत्रे समजून भेट दिली पाहिजे. त्यांनी व्यावसायिक पशुपालनात नोदींचे महत्त्व अधोरेखीत केले. पुढील काळात दुधाच्या गुणवत्तेकडेही अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संचालन डॉ.नितेश काष्टे, तर आभार किशोर साखरे यांनी मानले. यशस्वितेसाठी गजानन गायकी, अनिता साखरे, लक्षण बोरकूट, सुमित आहाळे, डॉ.श्रीकृष्ण मंदाडे, विशाल बोरेले, प्रशांत ठाकरे, शरद साखरे, योगेश साखरे, पवन साखरे, आकाश दुपारते आदींनी सहकार्य केले.