कीटकनाशकामुळे शेतकरी मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 10:37 PM2019-09-07T22:37:28+5:302019-09-07T22:37:38+5:30
गजानन मारोती डोंगरे (वय 35, रा. उमरी पठार) असे मृताचे नाव आहे.
आर्णी(यवतमाळ) : शेतात कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्याने शेतकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आर्णी तालुक्यातील उमरी (पठार) येथे घडली. यंदाच्या खरीप हंगामात कीटकनाशकामुळे आर्णी तालुक्यातील हा पहिला बळी ठरला आहे.
गजानन मारोती डोंगरे (वय 35, रा. उमरी पठार) असे मृताचे नाव आहे. वडिलांच्या नावे असलेल्या सात एकर कपाशी पिकावरील शेतात त्याने गुरुवारी 5 सप्टेंबरला कीटकनाशक फवारणी केली. फवारणी करून सायंकाळी घरी परतल्यावर गजाननला शुक्रवारी मळमळ होत उलटीचा त्रास सुरू झाला. त्याला तत्काळ आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याच दिवशी रात्री साडेदहाला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, तपासणी करताच डॉक्टरांनी गजाननला मृत घोषित केले.
वडिलांच्या नावे असलेली सात एकर शेतीची वहिती करून गजानन कुटुंबाचा गाडा ओढत होता. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील, लहान भाऊ आहे.