शेतकरीपुत्राची कंपनी ‘फोर्ब्स’च्या यादीत; यवतमाळमधील ‘ग्रामहित’चा चांगल्या उत्पन्नासाठी 3 हजार शेतकऱ्यांना आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 01:17 PM2022-09-04T13:17:33+5:302022-09-04T13:18:15+5:30
आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) या छोट्याशा गावातील पंकज महल्ले व श्वेता महल्ले या उच्चशिक्षित दाम्पत्याने यशाला गवसणी घातली आहे.
आर्णी (जि. यवतमाळ) : शेतकऱ्यांच्या मालाला सुरक्षितता आणि चांगला भाव मिळावा, त्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी शेतकरीपुत्राने स्थापन केलेल्या कंपनीने तीन हजारांवर शेतकऱ्यांना सेवा दिली आहे. या कामाची अमेरिकन मासिक ‘फोर्ब्स’ने दखल घेतल्याने यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाकाळात या कंपनीने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करून मोठा आधार दिला होता.
आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) या छोट्याशा गावातील पंकज महल्ले व श्वेता महल्ले या उच्चशिक्षित दाम्पत्याने यशाला गवसणी घातली आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी २०१८ मध्ये शेतकऱ्यांसाठी ‘ग्रामहित’ ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकाच्या काढणीनंतर शेतमाल, बाजारपेठेतील चढउतार, शेतमालाला सुरक्षितता मिळवून देणे आदींबाबत मोबाईलद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातील वरूड, सावळीसदोबा आणि कळंब, तर अकोला जिल्ह्यातील मंगरूळ कांबेसह इतर दोन गावांत सहा गोडाऊन उभारली असून शेतमाल गोडाऊनमध्ये ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना कंपनीतर्फे अल्प व्याजदरावर कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो.
उच्चशिक्षित दाम्पत्य
- शेतकरीपुत्र असलेल्या पंकज महल्ले यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून समाजकार्याची पदव्युतर पदवी प्राप्त केली. काही वर्षे टाटाच्याच सीएसआर प्रकल्पात काम केले.
- श्वेता महल्ले यांनी अभियांत्रिकी पदवीनंतर हैदराबाद येथून आयआयटी पदव्युत्तर पदवी मिळविली. या दोघांनीही मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘ग्रामहित’ सुरू केले. आज ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे.