शेतकऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश; सावकारी विळख्यातून २० वर्षानंतर सुटली शेती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 01:23 PM2023-06-16T13:23:33+5:302023-06-16T13:26:06+5:30
जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाने दोन शेतकऱ्यांना दिलासा
यवतमाळ : अवैध सावकाराने व्याजाच्या पैशात दाेन शेतकऱ्यांचे ९ एकर शेत हडपले हाेते. सावकाराचा या शेतावर २० वर्षे ताबा हाेता. अडचणीत असलेल्या या शेतकऱ्यांना सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने धीर देत कायदेशीर लढाईसाठी तयार केले. सातत्याने पाठपुरावा केला, याेग्य बाजू असल्यााने जिल्हा उपनिबंधकानी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. याच शेतांचा बाभूळगाव तालुक्यातील एरंडगाव व वडगाव येथे सावकारी फास गुरुवारी ताेडण्यात आला. पाेलिस व उपनिबंधकांचे प्रतिनधी यांच्या उपस्थितीत शेताचा ताबा शेतकऱ्यांनी घेतला.
राजेंद्र वानखडे यांनी एरंडगाव येथे, तर संजय गावंडे यांचे वडगाव येथील शेत एका महिला सावकाराने ताब्यात घेतले हाेते. जिल्ह्यात अवैध सावकारांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अवैध सावकारीच्या माध्यमातून खरेदी करून घेतल्याची प्रकरणे आहेत. यासाठी लढणाऱ्या सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने संघर्ष केला. यात निर्माण झालेल्या नव्या सावकारी अधिनियमाची माहिती शेतकऱ्यांना देऊन सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रारी दाखल करण्याबाबत मार्गदर्शन केले. यात आमदार विद्याताई चव्हाण यांनी सहकार्य केले. त्यामुळे गेल्या २० वर्षांपासून न्यायासाठी झगडणाऱ्या राजेंद्र वानखडे आणि संजय गावंडे यांना यंदा खरिपाच्या तोंडावर त्यांची हक्काची जमीन परत मिळाली.
शेताचा ताबा देण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष शेतावर जाऊन करण्यात आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या आदेशानुसार बाभूळगावचे सहायक निबंधक व्ही. व्ही. रणमले, डोंगरे, गाडे, मंडळ अधिकारी झिल्टे, तलाठी जडेकर, तलाठी भेंडारकर, कुंभारे, ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था सचिव प्रशांत येंडे, शुभम लांडगे, सुनील शेडमाके, पोलिस जमादार शिंदे, हुमने, नांदेकर, पाथोटे यांच्यासह सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.घनश्याम दरणे प्रामुख्याने उपस्थित होते.