सत्तेच्या साठमारीत शेतकरी हवालदिल: उद्धव ठाकरे, भाजपच्या निष्ठावंतात खदखद
By सुरेंद्र राऊत | Published: July 9, 2023 03:18 PM2023-07-09T15:18:24+5:302023-07-09T15:18:46+5:30
दुर्देवाने आताचे राजकारणी पक्ष पळविण्यातच व्यस्त आहेत.
सुरेंद्र राऊत, यवतमाळ : राज्यातील सत्तेची साठमारी सुरू आहे. यात कुणाला सोबत घ्यायचे, जवळ बसवायचे असे प्रयोग सुरू आहे. दुसरीकडे मात्र येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्यावर पावसाच्या अनियमिततेमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यातच बोगस बियाण, खत याही समस्या उभ्या ठाकल्या आहे. एकूणच ही परिस्थिती निर्माण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर त्यांच्याच पक्षातील निष्ठावंत नाराज होत आहेत, असे शिवसेनेचे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी यवतमाळात झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले.
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घेवून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजकारणाची सुरुवात केली. आता ही मंडळी सत्तेत आल्यानंतरही त्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील समस्याची जाण असल्याचे सांगत आज येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. येथील शेतकऱ्यांच्या पिकाला हमखास भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी विकेल ते पिकेल अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे. दुर्देवाने आताचे राजकारणी पक्ष पळविण्यातच व्यस्त आहेत.
भाजपसोबतच्या युतीत २०१९ मध्ये अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्याचा फाॅर्म्युला ठारला होता. तो त्यांनी पाळला नाही. यामुळे आता भाजपातील ज्येष्ठ कार्यकर्ते व निष्ठावंतांवरच सतरंज्या उचलायची वेळ आली आहे. ही खदखद यातील काहींनी खासगीत आपल्याकडे बोलून दाखविल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. ज्या भुजबळांवर टिका केली जात होती त्यांनाच आज सत्तेत घेतले आहे. राज्यातील हा प्रकार कार्यकर्ता व सामान्य जनतेला रुचलेला नाही. त्यामुळे आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. स्वत:हून लोक भेटायला येत आहे. ज्याप्रमाणात आऊट गोईंग आहे त्यापेक्षा दुपटीने इनकमींग सुरू आहे.
आमच्या शेतातील एक पीक त्यांनी कापून नेलं. मात्र आता आम्ही नव्याने लागवड करून चांगल पीक घेणार आहो. त्याला जनतेच सहकार्यही मिळत आहे. शिवसैनिकांना संधी दिली जात आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.
दाैऱ्याची सुरुवात राज्यात कुठूनही केली असती तरी प्रश्न इथूनच का असा विचारला गेला असता. महाविकास आघाडीच्या सभा घेताना यवतमाळ जिल्हा सुटला. शिवाय बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. त्यामुळे दाैऱ्याची सुरुवात या पवित्र स्थळापासून केली. या दाैऱ्यात जाहीर सभा होणार नाही. सध्या शेतीच्या कामाचे दिवस आहे. माझा शिवसैनिकही शेतकरी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकून घ्यायच्या आहे. पुढची रणनिती ठरवायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागेल. असा निर्णय घेतला नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, लक्ष्मण वडले आदी उपस्थित होते. पत्रपरिषदेनंतर उद्धव ठाकरे पोहरादेवीकडे रवाना झाले. दिग्रस येथे कार्यकर्त्याच्या भेटीनंतर ते अमरावती मुक्कामी जाणार आहे.