प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना दमदाटी
By admin | Published: January 13, 2016 03:04 AM2016-01-13T03:04:23+5:302016-01-13T03:04:23+5:30
तालुक्यातील हटवांजरी येथे नियोजित लघु सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना नोटीस देऊन दमदाटी करण्यात येत आहे.
वाटाघाटींची मागणी : हटवांजरी येथील लघु सिंचन प्रकल्प
मारेगाव : तालुक्यातील हटवांजरी येथे नियोजित लघु सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना नोटीस देऊन दमदाटी करण्यात येत आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांसोबत सामोपचाराने चर्चा, वाटाघाटी करून त्यांच्या जमिनी अधिग्रहित कराव्या, अशी मागणी होत आहे.
विदर्भ पाटबंधारे विभागाअंतर्गत हटवांजरी येथे २७८ हेक्टर सिंचन अपेक्षित असणाऱ्या लघु सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी परिसरातील ४५ शेतकऱ्यांची ६७ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. यासाठी संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी ‘दलालां’च्या माध्यमातून काही शेतकऱ्यांच्या जमिनी विक्री करून अधिग्रहित केल्या आहे. तथापि अद्याप ११ शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या नाहीत.
सन २००७ मध्ये जमिनी अधिग्रहणाची नोटीस मिळताच तेथील नीळकंठ महादेव कालेलकर नामक शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, हे विशेष. त्यांच्या आत्महत्येमुळे जमीन अधिग्रहणाचे काम थंडावले होते. आता तब्बल आठ वर्षानंतर पुनश्च शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुणावरही आत्महत्येची वेळ येऊ नये, म्हणून संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी, शेतकऱ्यांना नोटीस बजावून, धाकदपट करण्यापेक्षा उर्वरित ११ शेतकऱ्यांसोबत समोपचाराने वाटाघाटी कराव्या, शेतकऱ्यांना सध्याच्या बाजारभावापेक्षा चौपट दराने मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)