भाजीपाला पिकांसाठी शेतकरी प्रशिक्षण वर्ग
By admin | Published: August 1, 2016 12:52 AM2016-08-01T00:52:44+5:302016-08-01T00:52:44+5:30
बळीराजा चेतना अभियानांंतर्गत स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे भाजीपाला पिकावरील किड...
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे आयोजन : भाजीपाला पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन
मारेगाव : बळीराजा चेतना अभियानांंतर्गत स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे भाजीपाला पिकावरील किड व रोग व्यवस्थापन या विषयावर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गुरूवारी दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.
तालुक्यात भाजीपाला पिकांवर विविध किड व रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत असून किड नियंत्रणासाठी बेसुमार किटक नाशकांचा वापर करण्यात येतो. परिणामी उत्पादन खर्चात वाढत होऊन शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.
ग्राहकांनासुद्धा विषयुक्त भाजीपाला मिळत असल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे बळीराजा चेतना अभियान अंतर्गत भाजीपाला पिकावरील किड व रोग व्यवस्थापन या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन तहसीलदार विजय साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पांढरकवडाचे उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते व वणीचे तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गाला भाजीपाला पिक लागवडीचे तंत्रज्ञान यावर प्रा.शेंबेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांमध्ये असलेल्या विविध शंकांचे त्यांनी निरासरण केले.
त्यानंतर प्रा.शरणागत यांनी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, पीक संरक्षणाविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अधिकारी एस.जी.नाईक यांनी प्रभावी किड नियंत्रणासाठी यांत्रीक किड नियंत्रण तंत्रज्ञानाची माहिती दिली. प्रगतीशील शेतकरी अरविंद बेंडे यांनी नियमित शेतीतून भाजीपाला लागवडीबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आयोजित प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमाचे संचालन मारेगाव तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार यांनी केले. समारोपीच कार्यक्रमाचे संचालन मंडळ कृषी अधिकारी पुरूषोत्तम ठाकरे यांनी केले. प्रशिक्षण वर्गाला तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षण वर्गाचे यशस्वी आयोजन व यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रसन्न पारसकर, प्रमोद यवतकर व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने घेतलेल्या या प्रशिक्षण वर्गाबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)