आर्थिक चिंतेच्या सावटाखाली शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:06 AM2017-10-19T05:06:27+5:302017-10-19T05:06:35+5:30
अपु-या पावसाने खरिपातील मूग, उडीद आणि सोयाबीन ही पिके मातीमोल झाली आहेत. तर परतीच्या पावसाने कापसाचे मोठे नुकसान केले आहे.
- रूपेश उत्तरवार
यवतमाळ : अपु-या पावसाने खरिपातील मूग, उडीद आणि सोयाबीन ही पिके मातीमोल झाली आहेत. तर परतीच्या पावसाने कापसाचे मोठे नुकसान केले आहे. त्यातच कर्जमाफीचा छदामही घरात आलेला नाही. त्यामुळे शेतकºयांच्या घरात दीपोत्सवाच्या सणावर आर्थिक चिंतेचे सावट आहे.
कीटकनाशकांच्या विषबाधेतून झालेले मृत्यू, वीज कोसळून मृत्यू, वाघाने घेतलेले बळी, जंगली जनावरांचा धुमाकूळ, कृषीपंपावर १८ तासांचे भारनियमन, हमीदराच्या खाली होणारी धान्य खरेदी आणि बोगस बियाणे यांसह अनेक कारणाने जिल्ह्यातील शेतकरी या वर्षी संकटात सापडले आहेत.
तसेच सोयाबीन सोंगण्याची मजुरी, थ्रेशर मशिनदाराचे पैसे, कापूस वेचणीचे पैसे, यासह अनेक प्रश्न शेतकºयांपुढे आ वासून उभे आहेत. त्यामुळे घरातील थोडाथोडका मालही शेतकºयांनी विक्रीस काढला आहे. मात्र याच गैरफायदा घेत व्यापाºयांनी धान्याची हमीदराखाली खरेदी सुरू केली आहे.
युवा शेतकºयाची आत्महत्या
तेल्हारा (जि. अकोला) तालुक्यातील वरूड बिहाडे येथील युवा शेतकºयाने थकीत कर्जाच्या विवंचनेतून बुधवारी ऐन दिवाळीत विषप्राशन करून आत्महत्या केली. अंबादास प्रल्हाद ठोसर (२७) असे मृताचे नाव आहे. सहकारी सेवा सोसायटी, बँकेचे कर्ज आणि दिवाळी सण कसा साजरा करायचा या विवंचनेत ते होते.