शेतकऱ्याचा भाजीपाला मातीमोल, विक्रेत्यांची चांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:38 PM2019-06-12T23:38:31+5:302019-06-12T23:39:28+5:30
दुष्काळामुळे आधीच शेतकरी नागवला गेला. आता पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तरीही त्यांचा भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे. मात्र विक्रेत्यांनी हाच भाजीपाला चढ्या दराने विकण्याचा सपाटा लावल्याने सामान्य ग्राहक वतागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : दुष्काळामुळे आधीच शेतकरी नागवला गेला. आता पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तरीही त्यांचा भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे. मात्र विक्रेत्यांनी हाच भाजीपाला चढ्या दराने विकण्याचा सपाटा लावल्याने सामान्य ग्राहक वतागले आहे.
सर्व भाजीपाल्याचे दर किलोमागे जवळपास १00 रुपयांच्या आसपास झाले आहे. परिणामी आहारातून हिरव्या भाज्यांची संख्या कमी झाली. त्याऐवजी डाळींचा वापर वाढला आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यातील सर्वच नदी-नाले कोरडे पडले. विहीर व विंधन विहिरीची पाणी पातळी खोल गेली. परिणामी ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली. माळरानही ओस पडले. पाणीटंचाईमुळे विकतचे पाणी घेऊन दिवस काढणाºया नागरिकांवर आता भाजीपाला महागल्याचा भार पडला.
पाणी नसल्यामुमळे भाजीपाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपालाच नाही. ज्यांनी लागवड केली, त्यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. दुसरीके हाच भाजीपाला विक्रेते चढ्या दराने विकत आहे. परिणामी प्रत्येक भाजीपाल्याचे किलोमागे दर वधारले. महिलांना गल्लीत येणाऱ्या हातगाडीवर भाजीपाला खरेदी करणे अवघड झाले. हातगाडीवर आधीच आठवडी बाजारापेक्षा जादा दर असतात. आता हे दरही चांगलेच वधारले आहे. बाजारातून भाजीपाला आणायचा म्हटल की ग्राहकांच्या अंगावर काटा येत आहे. यात मोठे कुटुंब असेल तर पाचशे रुपयांची नोट क्षणार्धात खरेदीत जात आहे.
कमी पावसाचा बसला फटका
गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेती उत्पादनावर मोठा परिणाम झाला. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. भाजीपाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. यावर्षी पाणीटंचाईमुळे अनेकांनी भाजीपाल्याची लागवडच केली नाही. गेल्यावर्षीचा कमी पाऊस आणि यंदाची पाणीटंचाई यामुळे भाजीपाल्याचे दर वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जाते.