शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 10:30 AM2018-12-11T10:30:30+5:302018-12-11T10:45:26+5:30
१६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
मुकेश इंगोले
यवतमाळ - तालुक्यात १६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
अतिवृष्टी व नदी-नाल्यांच्या पुरामुळे ७९ गावातील २ हजार ८१५ शेतकऱ्यांच्या ११ हजार ९३ हेक्टर क्षेत्रावरील शेतातील पिकांचे व ३०१ घरांचे नुकसान झाले. यानुकसानीचे सर्वक्षण करुन अहवाल पाठविण्यात आला आहे. दारव्हा तालुक्याला १५ व १६ ऑगस्टला पावसाने जबरदस्त तडाखा दिला. पंधरा तासात १२१.४२ मीमी पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातील सर्व छोटे-मोठे प्रकल्प नदी-नाले तुडुंब भरले.काही ठिकाणी पाझर तलाव फुटल्यामुळे पाणी गावात व शेतात घुसले त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. दारव्हा तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०५ मी.मी.आहे. या दोन दिवसांच्या पावसामुळे मोठी भर पडली. एकूण ६५९.८६ मी. मी.पाऊस पडला. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच वार्षिक सरासरीच्या जवळपास आकडा पोहोचला. यावरून या अतिवृष्टीचा अंदाज येऊ शकतो.
मोठ्या प्रमाणातील पावसामुळे सर्व छोटे-मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. नदी नाल्यांना पूर आला. त्याचबरोबर वरून जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे सर्व पाणी शेतात जमा झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी तालुक्यात ३३ह जार चारशे हेक्टर कापूस, २२ हजार तीनशे हेक्टर सोयाबीन, ८ हजार पाचशे हेक्टर तुर, ४०९ हेक्टर मुग, ३६५ हेक्टर उडीद यासह फळबाग व इतर पिकाची लागवड झाली. यामधील झालेल्या नुकसानीच्या सर्वेनंतर ७९ गावातील २ हजार ८१६ शेतकऱ्यांचे ९ हजार ९१८.१५ हेक्टर ३३ टक्केच्या वर तर १ हजार ९१८.११ हेक्टरवरील शेती खरडुन गेल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर ३०१ घरांची पडझड होऊन जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले. ४६ जनावरे मृत्युमुखी पडली. यातील ३०१ कुटुंबांना १४ लाख ९५ हजार रूपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. तर पशुधन खरेदीसाठी ४ लाख ७ हजाराची मदत देण्यात आली. मात्र शेतीच्या नुकसानाची भरपाई अद्यापही मिळाली नाही त्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
दोन हेक्टरची मदत मिळेल
ओलीत पिकांना हेक्टरी १३ हजार पाचशे, कोरडवाहु ६ हजार आठशे तर खरडलेल्या जमिनीची ३ हजार ७५९ रुपये मदत मिळेल मात्र त्यातही दोन हेक्टरची मर्यादा असेल.झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत तोकडी आहे.आणी तीसुद्धा चार महीने होऊन गेले तरी शेतकऱ्यांच्या हातात अजुनपर्यंत पडली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त केल्या जात आहे.