पांदण रस्त्यांसाठी शेतकऱ्यांची फरफट
By admin | Published: May 27, 2016 02:17 AM2016-05-27T02:17:19+5:302016-05-27T02:17:19+5:30
तालुक्यातील शेतशिवारांना जोडणाऱ्या पांदण रस्त्यांसाठी शेतकऱ्यांची फरफट होत असून आता पावसाळा जवळ येत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे.
रस्त्यांची दुरावस्था : शिवसेनेचे महागाव तहसीलदारांना निवेदन
महागाव : तालुक्यातील शेतशिवारांना जोडणाऱ्या पांदण रस्त्यांसाठी शेतकऱ्यांची फरफट होत असून आता पावसाळा जवळ येत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे.
पांदण रस्ते ३१ मेपूर्वी मोकळे करुन देण्याचे शासनाचे धोरण आहे. मागणी आली की लगेच कामाला प्राधान्य देऊन रस्ते मोकळे करून देण्याचे आदेश आहे. मात्र महागाव तालुक्यात रस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची फरफट होत आहे. उटी येथील पांदण रस्त्याचे काम क्षुल्लक कारणाने बंद करण्यात आले आहे. येथील आत्माराम गावंडे यांनी पांदण रस्ता जूनपूर्वी करुन देण्याची मागणी केली आहे. उटी पाठोपाठ तालुक्यातील शेकडो पांदण रस्त्यांची मागणी धूळ खात पडून आहे. पांदण रस्त्यांबाबत शासन आग्रही असताना स्थानिक प्रशासन कामच करायला तयार नाही. अनेक पांदण रस्ते मोजणीचे प्रस्ताव तालुका भूमी अभिलेख कार्यालयात तसेच पडून आहे. अंबोडा येथील डॉ. दादाराव देशमुख यांनी राज्य मार्गाला लागून असलेल्या शेतामधून स्मशानभूमीला जाण्यासाठी १५ ते २० फुटाचा रस्ता देऊ केला आहे. याच रस्त्याला लागून जुना पांदण रस्ता आहे. दोनही जागेचे सर्वेक्षण करुन स्मशानभूमीला तत्काळ रस्ता देण्यात यावा, याबाबत डॉ. देशमुख आग्रही आहेत. याच प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: दखल घेऊन रस्त्याचे तत्काळ मोजमाप करण्याचे आदेश दिले. परंतु भूमिअभिलेखला अद्याप वेळ मिळाला नाही.
आता जून महिना तोंडावर आलेला असताना पांदण रस्त्याचे काम रखडले आहे. पांदण रस्ते मोकळे करुन देण्यासाठी अनेक शेतकरी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. परंतु अद्यापही सकारात्मक निर्णय होत नाही. दरम्यान शिवसेनेने तहसीलदारांना निवेदन देऊन आमणी बु., मुडाणा, उटी, महागाव, दहीसावळी, इजनी, पोहंडूळ, हिवरा व इतर गावातील रस्ते मोकळे करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख समाधान ठाकरे, युवा सेना तालुका प्रमुख प्रवीण कदम, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अॅड. कैलास वानखडे, लक्ष्मीबाई पारवेकर, सतीश नरवाडे, अशोक तुमवार, संदीप खराटे, राजू देवतळे, ग्यानबा नावाडे, विशाल गुप्ता आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (शहर प्रतिनिधी)