कोरोनात वाचलेली शेती कंपन्यामुळे धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 03:56 PM2020-07-01T15:56:19+5:302020-07-01T16:00:31+5:30
कोट्यवधीचा नफा मिळूनही समाधानी नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना बुडवायला निघाल्या आहेत. यामुळे कोरोनातून वाचलेली शेती आता कंपन्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीने धोक्यात आली आहे.
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : देशभरात उद्योग व्यवसाय ठप्प पडले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा स्थितीत शेतीतील रोजगार टिकून आहे. या व्यवसायालाही पोखरण्याचे काम बियाणे आणि खत कंपन्यांनी सुरू केले आहे. कोट्यवधीचा नफा मिळूनही समाधानी नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना बुडवायला निघाल्या आहेत. यामुळे कोरोनातून वाचलेली शेती आता कंपन्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीने धोक्यात आली आहे.
आजपर्यंत बियाणे आणि खतावर शेतकऱ्यांचा विश्वास होता. यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. बोगस खताचा पुरवठा झाला. पेरणीनंतरच हा प्रकार उघड झाला. तोपर्यंत बोगस बियाणे विकलेल्या कंपन्यांचे फावले. यातच निसर्ग प्रकोपाने शेतशिवार थरथरत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत शेतकऱ्यांचे शेकडो प्रश्न जसेच्या तसे आहेत. यामुळे अनेक पिढ्या शेती कसल्यानंतरही शेतीची अवस्था सुधारली नाही. कधी पाऊस जास्त पडतो तर कधी कमी बरसतो. या स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहणारे सरकार दिसत नाही. कोरोनाच्या संकटकाळात शेती हा एकमेव उद्योग वाचला आहे. इतर उद्योगांनी हात वर केले आहे. अशा स्थितीत बेरोजगारांचा संपूर्ण भार शेतीवरच आला आहे. शेतीचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश भागात १० ते १५ दिवस पावसाचा खंड पडला आहे. सिंचन करण्यासाठी वीज मिळत नाही. कृषी फिडरवर १६ तासांचे भारनियमन आहे. यात तीन दिवस दिवसा आणि चार दिवस मध्यरात्री वीज पुरवठा होत आहे. या बिकट स्थितीत दिवसा वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने वीज वितरणने कुठल्याही उपाययोजना केल्या नाही. अनेक भागात वायरमनचा तुटवडा आहे. तर वीज पुरवठा करणारे खांबही वाकले आहे.
यावर्षी बोगस बियाणे आणि खतांचा पुरवठा झाला आहे. शेतकºयांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. अशा १२०० वर तक्रारी दररोज पुढे आल्या आहेत. यातून १० हजार हेक्टरला फटका बसला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यास यंत्रणा कमी पडत आहे. या स्थितीचा फायदा कंपन्या घेत आहे. शेतीचे संपूर्ण अर्थचक्रच बिघडले आहे. कर्जमुक्तीचा मोठा हातभार शेतकऱ्यांना लाभणार होता. पण रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयकृत बँकांना कुठल्याही सूचना दिल्या नाहीत. यामुळे लाखावर शेतकरी कर्जात अडकून पडले आहेत.
हवामान खात्याने दिला दगा
हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रारंभी पाऊस पडला. मात्र नंतर पाऊस गायब झाला. आता अशा स्थितीत शेतकऱ्यांचे लाखमोलाचे बियाणे अडकले आहेत.