पुसद बाजार समिती विरोधात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:15 PM2018-01-24T23:15:47+5:302018-01-24T23:16:03+5:30
पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीविरुध्द दोन संघटनांनी येथील तिरंगा चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीविरुध्द दोन संघटनांनी येथील तिरंगा चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
पुसद बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करत बेकादेशीर कामे केली. या प्रकरणात फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपोषण सुरू केले आहे. पुसद सहाय्यक निबंधक, बाजार समिती सभापती, सचिव आणि कनिष्ठ अनियंत्यांनी नियमाचे उल्लंघन केले. शेंबाळपिंप्री येथील दुकान गाळे परस्पर भाड्याने दिले. अतिरिक्त बांधकामाला बेकायदेशीर परवानगी दिली, असा या संघटनेचा आरोप आहे.
संचालक मंडळ बरखास्त करा
पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीत वारंवार गैरप्रकार घडत आहेत. यामुळे संचालक मंडळ बरखास्त करावे यासह विविध मागण्यांना घेऊन लक्ष्मण कांबळे, बाबाराव ढोले, पंडित बैस, दिलीप धुळे यांनी तिरंगा चौकात उपोषण सुरू केले आहे. भूईमुगाची विनापरवाना खरेदी, शेष शुल्क, सुपर व्हिजन फी तथा बाजार फी न भरणे, बाजार समितीच्या जागा परस्पर विकणे असे गंभीर प्रकार पुसद बाजार समितीत घडले आहे. यामुळे संचालक मंडळ बरखास्त करावे. नियमबाह्य पध्दतीने झालेली सचिवाची भरती रद्द करावी आदी मागण्यांसाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे.