‘भगवंत’च्या ठेवीदारांचे उपोषण
By admin | Published: April 1, 2017 12:24 AM2017-04-01T00:24:45+5:302017-04-01T00:24:45+5:30
ठेवीची रक्कम सव्याज मिळावी यासाठी येथील भगवंत बिगर शेतकी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी उपनिंबधक कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.
कारवाईस टाळाटाळ : पोलीस व उपनिबंधक कार्यालयाविरुद्ध रोष
आर्णी : ठेवीची रक्कम सव्याज मिळावी यासाठी येथील भगवंत बिगर शेतकी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी उपनिंबधक कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. पोलीस आणि उपनिबंधक कार्यालयाकडून या पतसंस्थेवर कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप ठेविदारांनी केला आहे.
या पतसंस्थेमध्ये तीन कोटी सहा लाख ८४ हजार पाच रुपयांची अफरातफर झाल्याचे आॅडिटमध्ये स्पष्ट झाले. बँकेचे संचालक, कर्मचारी, आरडी एजंट यांनी मिळून ही अफरातफर केल्याचे समोर आले आहे. या विषयी पोलिसात तक्रार करण्यात आली. परंतु कठोर कारवाई झाली नाही. सदर प्रकरणी चौकशी व्हावी, अफरातफर करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, १८ टक्के व्याजदराने ठेवी परत कराव्या आदी मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे.
रमेश चल्लावार, शेषराव मस्के, लक्ष्मण इंगोले, ताराबाई बान्ते, सुरेश ठाकरे, मनीषा येरावार, अनसूया मानकर, अहिल्या जयस्वाल, सुनीता बेलगमवार, लक्ष्मीबाई केराम, नंदा रेक्कलवार, रजनी देशमुख, विठ्ठल लाड, अरविंद देशकरी, शे. मुसा शे. कादर, नारायण चिंतावार, रामदास येरावार, राजाभाऊ पद्मावार, स्वप्नील राठोड, उत्तम जाधव, प्रशांत केशववार आदी ठेवीदार उपोषणात सहभागी झालेले आहेत. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नाईलाजाने तीव्र उन्हातही आम्हाला उपोषणाला बसावे लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून सदर प्रकरणी कठोर कारवाई करून न्याय द्यावा, अशी प्रतिक्रीया निवृत्त मुख्याध्यापक तथा ठेवीदार राजाभाऊ पद्मावार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)