पैनगंगेच्या कोरड्या पात्रात उपोषण
By admin | Published: March 31, 2017 02:28 AM2017-03-31T02:28:18+5:302017-03-31T02:28:18+5:30
विदर्भ-मराठवाड्याची जीवनदायी पैनगंगा कोरडी पडल्याने इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी या भागातील....
भीषण टंचाई : इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी
उमरखेड : विदर्भ-मराठवाड्याची जीवनदायी पैनगंगा कोरडी पडल्याने इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी भोजनगर तांडा येथील पैनगंगेच्या कोरड्या पात्रात बुधवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. विदर्भ-मराठवाड्यातील अनेक गावातील नागरिक यात सहभागी झाले आहेत.
पैनगंगा नदी यावर्षी हिवाळ्यातच कोरडी पडली. त्यामुळे नदीतीरावरील गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गत ५ मार्च रोजी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. परंतु गाजेगाव येथील बंधाऱ्याचे गेट बंद केल्याने खालच्या भागात पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे या तीरावरील अनेक गावात पाणीटंचाई कायम आहे.
इसापूर धरणाचे पाच टीएमसी पाणी सोडावे, या मागणीसाठी बिटरगावजवळील भोजनगर तांडा येथे नागरिक उपोषणाला बसले आहे. त्यात विदर्भातील बिटरगाव, भोजनगर तांडा, रामरतननगर तांडा, मुरली, पिंपळगाव, लिंगी, सहस्त्रकुंड तर मराठवाड्यातील बोरगडी, धानोरा, शेलोडा, एकंबा, कवठा, शिरपल्ली, शेंदोडा, पळसपूर, डोल्हारी या गावातील नागरिकांचा समावेश आहे. अद्यापपर्यंत या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही. आता प्रशासन या प्रकरणी काय निर्णय घेते आणि पाणी केव्हा सोडते, याकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)