बापाने मुलाला मारहाण करून विहिरीत फेकले
By admin | Published: November 17, 2015 04:02 AM2015-11-17T04:02:17+5:302015-11-17T04:02:17+5:30
दारू पिऊन त्रस्त करणाऱ्या मुलाला वडिलांनी दुसऱ्या मुलाच्या मदतीने बेदम मारहाण करून विहिरीत फेकून जीवे
झाडगाव : दारू पिऊन त्रस्त करणाऱ्या मुलाला वडिलांनी दुसऱ्या मुलाच्या मदतीने बेदम मारहाण करून विहिरीत फेकून जीवे मारल्याची घटना राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे रविवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. आईने दिलेल्या तक्रारीवरून वडील आणि मुलाला राळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
किरण रमेश चौधरी (२७) रा. झाडगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. तर वडील रमेश पांडुरंग चौधरी (५५) आणि मुलगा नीलेश रमेश चौधरी (२२) अशी आरोपींची नावे आहे. किरणला गेल्या काही दिवसांपासून दारूचे व्यसन जडले होते. तो दारू पिऊन घरच्यांना त्रास देत होता. मक्त्याने केलेल्या शेतातील आलेला कापूस किरणने रविवारी सकाळी विकला. या पैशातून दारू पिऊन तो घरी आला. हा प्रकार वडिलांंना माहीत होताच त्यांनी किरण सोबत वाद घातला. त्याला बेदम मारहाण केली. आई रेखाबाईने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रमेश ऐकत नव्हता. शेवटी सर्वात लहान मुलगा प्रवीणला घेऊन जवळच असलेल्या रावेरी येथे आपल्या भावाला बोलाविण्यासाठी ती गेली.
दरम्यान इकडे बेशुद्ध पडलेल्या किरणाला रमेश आणि मुलगा नीलेशने उचलून गावाशेजारील अनिल केवटे यांच्या विहिरीत नेऊन टाकले. रेखा आपल्या भावाला घेऊन झाडगाव येथे आली असता तिला किरण दिसला नाही. तिने मुलगा नीलेशला विचारले असता मारहाणीनंतर किरणला विहिरीत फेकल्याचे सांगितले. हा प्रकार माहीत होताच तिने एकच हंबरडा फोडला. भावाच्या मदतीने राळेगाव गाठून पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी रमेश आणि मुलगा नीलेश या दोघांना रात्रीच अटक केली. किरणला मारहाण करुन विहिरीत फेकल्याची कबुली या बापलेकांनी पोलिसांपुढे दिली. सोमवारी सकाळी पोलिसांनी विहिरीतून किरणचा मृतदेह बाहेर काढला.
किरणच्या डोक्याला जबर मार लागलेला होता. तसेच नाका-तोंडातून रक्त येत होते. राळेगाव येथे शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार भारत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोळंकी, जमादार वादाफळे व शिपाई निखील खडतकर करीत आहे. (वार्ताहर)