यवतमाळ जिल्ह्यातील शिरोलीत चिमुकलीसह बापाची विहिरीत उडी; बापाचा मृत्यू ; मुलगी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 11:48 AM2020-05-20T11:48:39+5:302020-05-20T11:49:06+5:30
यवतमाळ तालुक्यातील शिरोली येथे एका युवकाने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला कडेवर घेऊन विहिरीत उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला तर ती चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला यवतमाळच्या शासकिय रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. ही घटना मंगळवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ - तालुक्यातील शिरोली येथे एका युवकाने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला कडेवर घेऊन विहिरीत उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला तर ती चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला यवतमाळच्या शासकिय रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. ही घटना मंगळवारी घडली.
किशोर शं.आत्राम (वय ३० वर्षे) रा. शिरोली असे या तरुणाचे नाव आहे. त्याने मंगळवारी दुपारी गावाशेजारी शेतात असलेल्या विहिरीत स्वत:च्या दोन वर्षाच्या चिमुकलीला सोबत घेऊन घरच्यांचे लक्ष चुकवित विहिरीत उडी मारली. तेव्हा ही बाब गावातील काही लोकांच्या लक्षात येताच त्यानी त्या विहिरीत उड्या मारून त्यांना वाचवण्याच्या प्रयत्न केला. तेव्हा दोन वर्षिय चिमुकली प्रिती हिला विहिरीतून पाण्याबरोबर काढले. तिला प्रथम रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र व नंतर घाटंजी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले . इकडे किशोर हा विहिरीच्या तळाशी गेल्याने व विहिरीत पाणी भरपूर असल्याने सापडला नाही. घटनेची माहिती घाटंजी पोलीसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्याची विहिरीत शोधाशोध केली असता किशोरचा मृतदेह सापडला. तेव्हा घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला परंतु सायंकाळी वेळ झाल्यामुळे मंगळवारी शवविच्छेदन होऊ शकले नाही.
किशोर हा पत्नी भिमाबाई व दोन मुली प्रिया व प्रिती हे कुटुंब राहत होते. या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा रोजमजुरीवर होत असे. परंतु आज अचानक चिमुकल्या लहान मुलीसह विहिरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचे कारण समचू शकले नाही..