४५ टक्के विद्युत मीटर फॉल्टी

By admin | Published: August 9, 2014 11:58 PM2014-08-09T23:58:06+5:302014-08-09T23:58:06+5:30

सगळ्यांसाठीच जीवनावश्यक असलेल्या विजेसाठी सर्वांना वीज कंपनीवर अवलंबून राहावे लागते. इतर दुसरा कोणताही पर्याय याबाबत नागरिकांकडे नाही. याचाच गैरफायदा घेऊन वीज कंपनी

Faulty 45% Power Meter | ४५ टक्के विद्युत मीटर फॉल्टी

४५ टक्के विद्युत मीटर फॉल्टी

Next

वसंतनगर : सगळ्यांसाठीच जीवनावश्यक असलेल्या विजेसाठी सर्वांना वीज कंपनीवर अवलंबून राहावे लागते. इतर दुसरा कोणताही पर्याय याबाबत नागरिकांकडे नाही. याचाच गैरफायदा घेऊन वीज कंपनी वाटेल तशी नागरिकांची पिळवणूक करीत आहे. याचा प्रत्यय नुकताच वसंतनगर परिसराला आला. या ठिकाणी महावितरणने तब्बल ४५ टक्के मीटर फॉल्टी दाखविले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मीटर नादुरुस्तीचा परिसरातील हा विक्रमच म्हणावा लागेल.
ग्राहकांना नाहक त्रास देण्याच्या प्रयत्नात महावितरणने वसंतनगर व वरंदळी मिळून असलेल्या ३०९ विद्युत मीटरपैकी तब्बल १४६ मीटर फॉल्टी दाखविले. वसंतनगर येथे ३३ केव्ही उपकेंद्र असूनसुद्धा विजेचा पुरवठा नियमित होत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. वीज खांबाजवळच्या किंवा झाडाजवळून गेलेल्या विद्युत तारांना वारंवार झाडाच्या फांद्या लागत असल्याने वीज पुरवठा सतत खंडित होतो. लाईनमन मुख्यालयी राहात नसल्याने खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी खासगी लाईनमनचा आधार घ्यावा लागतो. आपला जीव धोक्यात टाकून अप्रशिक्षित लाईनमन खांबावर चढतात. अशाप्रकारे कोणत्याही व्यक्तीकडून वीज पुरवठा दुरुस्त करून घेणे अतिशय धोकादायक आहे. अशा वेळी कोणतीही दुर्घटना घडू शकते. परंतु वीज कंपनीचा लाईनमनच उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांचा नाईलाज आहे.
मागील महिन्यात विठोली फिडरवर काम करताना सहाय्यक लाईनमनला विजेचा धोरदार झटका बसल्याने त्याला आपला एक हात गमवावा लागला होता. महावितरणने एकाच गावात ४५ टक्के मीटर एकाचवेळी फॉल्टी दाखविल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. सरासरी बिल पूर्वीच्या बिलाच्या तिप्पट येत असून ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. कंपनी सध्या सरसकट विद्युत ग्राहकांना किमान ५०० रुपयांच्या वरचे बिल देवून मोकळे होत आहे. या संदर्भात कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतल्या जात नसून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप गावकऱ्यांमधून होत आहे.
गारपीट, महापूर, अतिवृष्टी आदींच्या तडाख्यात सापडल्यामुळे परिसरातील शेतकरीवर्ग आधीच जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्यातच आता महावितरणनेसुद्धा त्रास देणे सुरू केले आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराने जनता त्रस्त झाली असून याचा परिणाम सार्वजनिक पाणीपुरवठ्यावरसुद्धा झाला आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी वीज बिल न भरता स्वत:जवळ ठेवतात. याचाही फटका ग्रामस्थांना बसत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून महावितरण कंपनीने ग्रामस्थांना नियमित वीज पुरवठा द्यावा व फॉल्टी मीटरची चौकशी करून बदलवून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Faulty 45% Power Meter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.