सदोष मीटर ठरले ग्राहकांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:31 AM2021-06-01T04:31:31+5:302021-06-01T04:31:31+5:30
एकीकडे वीज गळती आणि वीज चोरीवर कंपनीचे नियंत्रण नाही. वीज चोरीचा नाहक भुर्दंडही प्रामाणिक वीज ग्राहकांच्या माथी मारला जात ...
एकीकडे वीज गळती आणि वीज चोरीवर कंपनीचे नियंत्रण नाही. वीज चोरीचा नाहक भुर्दंडही प्रामाणिक वीज ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. वाढीव बिलांमुळे ग्राहक प्रचंड आर्थिक तणावात असून त्यांचे समाधान होत नसल्यामुळे वितरण कंपनी व शासनाविरुद्ध जनतेत चीड निर्माण झाली आहे.
सदोष मीटर बदलून देण्याची मागणी अनेक महिन्यांपासून ग्राहकांनी केली आहे. मात्र, नवीन मीटरचा पुरवठा झालेला नाही, हे ठरलेले उत्तर कंपनीकडून ग्राहकांना दिले जात आहे.
घरगुती वापराचे मीटर अनेकदा आवश्यकतेपेक्षा जास्त रीडिंग दाखवत असल्यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. घरगुती वापराच्या सर्व्हिस लाईनमुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे. यात सुसूत्रता निर्माण करावी, अशा काही ग्राहकांच्या मागण्या वीज वितरण कंपनीकडे नोंदवण्यात आल्या आहेत. परंतु कंपनीचे अधिकारी ग्राहकांच्या सेवेला जराही महत्त्व देत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे.
बॉक्स
वितरण कंपनीविरुद्ध असंताेष
महागाव तालुक्यातील वीज वितरण कंपनीचा कारभार स्थानिक अधिकाऱ्यांच्या हाताबाहेर गेला आहे. ग्राहकांच्या मागणीची पूर्तता होत नाही. दुसऱ्या बाजूला वीज चोरी, गळती यावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. विजेचा शॉक लागून जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. तरीही वरिष्ठ अधिकारी स्थानिक अधिकाऱ्यांच्या कामकाजावर कारवाई करीत नसल्याने कंपनीविरुद्ध ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.