वृक्षतोडीमुळे अपघाताची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:17 AM2019-02-09T00:17:56+5:302019-02-09T00:19:06+5:30
शहरातून जाणाºया दिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणासाठी तोडण्यात आलेल्या मोठमोठ्या झाडांची लाकडे गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यालगत पडून आहे. या लाकडांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : शहरातून जाणाºया दिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणासाठी तोडण्यात आलेल्या मोठमोठ्या झाडांची लाकडे गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यालगत पडून आहे. या लाकडांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे एका बांधकाम कंपनीमार्फत या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याकरिता शहरातील वृक्ष तोड करण्यात आली. मात्र तोडलेली लाकडे उचलण्याकडे बांधकाम कपंनीचे दुर्लक्ष होत आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नाही. दिग्रस-दारव्हा-कारंजा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. हा महामार्ग दारव्हा शहरातून जातो. त्यामुळे बसस्थानक ते दिग्रस बायपास या मार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगतची मोठमोठी वृक्षे तोडण्यात आली आहे.
वृक्ष तोडीनंतर मोठ्या प्रमाणात लाकडे रस्त्यालगत पडून आहे. या मार्गावरून दारव्हा ते यवतमाळ, अशी वाहतूक दिवस-रात्र सुरू असते. याच मार्गावर जिल्हा व सत्र न्यायालय, पाटबंधारे विभाग, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, विश्रामगृह, मुंगसाजी महाराज महाविद्यालय, गजानन महाराज मंदिर अशी शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था व मंगल कार्यालये आहे. त्यामुळे या मार्गाने दररोज नागरिक, वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र याच महत्त्वाच्या मार्गावर ही लाकडे अनेक दिवसांपासून पडून असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रात्री अनेक वाहनधारकांना रस्त्यालगतची ही लाकडे दिसत नाही. त्यामुळे दररोज किरकोळ अपघात घडत आहेत. यातूनच एखादवेळी मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम कंत्राटदाराचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या बेजबाबदारपणाबद्दल कंत्राटदारावर कारवाई व्हावी व रस्त्यालगतची लाकडे तत्काळ हटवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
वृक्षतोडीमुळे रस्ता झाला भकास
महामार्गाच्या रूंदीकरणासाठी बसस्थानक ते मुंगसाजी महाराज महाविद्यालयपर्यंतचे वृक्ष तोडण्यात आले. त्यामुळे मार्गावरील वातावरण भकास बनले आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वीची कडूलिंबाची मोठ्या प्रमाणातील वृक्षे वाटसरूंना सावली देत होते. या भागातील वातावरण या वृक्षांमुळे सुंदर वाटत होते. परंतु वृक्ष तोडीमुळे या मार्गाचे स्वरूपच बदलले आहे. अतिशय वयस्क असलेली ही वृक्षे तोडली गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रुंदीकरणासाठी वृक्ष हटविणे आवश्यक असले, तरी ते तोडण्याऐवजी इतर पर्यायांचा अवलंब करायला हवा होता, असे बोलले जात आहे.