वृक्षतोडीने पुसद वनाचे वाळवंट होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 10:25 PM2018-05-05T22:25:31+5:302018-05-05T22:25:31+5:30
नैसर्गिक संपदेने नटलेल्या पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. कधी काळी धनदाट असलेल्या जंगलातून जाताना भीती वाटायची. परंतु अलिकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल विरळ होत चालले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : नैसर्गिक संपदेने नटलेल्या पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. कधी काळी धनदाट असलेल्या जंगलातून जाताना भीती वाटायची. परंतु अलिकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल विरळ होत चालले आहे. अशीच परिस्थिती रहिल्यास भविष्यात पुसद तालुक्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.
पुसद तालुक्यातील खंडाळा, धुंदी, शेंबाळपिंपरी, मांडवा, माणिकडोह, धनसळ, शिळोणा, खैरखेडा, हनवतखेडा ही जंगले एकेकाळी घनदाट होती. सद्यस्थितीत ही जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उंच डोंगरावरून बघितले तर पुसद शहराच्या परिसरातील घनदाट वृक्षराज पूर्वी दृष्टीस पडत होते. आज मात्र शहरातील वाढती वसाहत, वृक्षतोड, औद्योगिकरण आदींमुळे शहराचा संपूर्ण चेहरा-मोहरा बदलला आहे. वृक्षतोडीमुळे पुसदच्या तापमानानेही विक्रम केले आहे. पुसद परिसरातील वनराईने नटलेल्या पर्वतरांगा आज उजाड झाल्या आहे. उरलेल्या वनसंपदेवर कुºहाड चालविली जात आहे.
डोंगराळ भागात राहणारे आदिवासी वृक्षांना देव मानून त्याचे रक्षण करीत होते. वनउपजावर आपली गुजरान करीत होते. परंतु संयुक्त वन व्यवस्थापनाच्या नावाखाली आदिवासींच्या परंपरागत वनउपजावरचा हक्क हिरावला गेला. परिणामी शतकानुशतके प्राणपणाने जंगल आणि वन्यजीवांचे रक्षण करण्याचा आदिवासींपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी जंगलाचे रक्षण करणे सोडून दिले. याच संधीचा फायदा तस्करांनी घेणे सुरु केले. स्थानिकांना हाताशी धरून तस्कर जंगलात शिरतात. सागवानासह आडजात वृक्षाची तोड करतात. या वृक्षतोडीमुळे पुसद तालुक्यातील पर्जन्यमानात घट होत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास निसर्गाचा हा अनमोल ठेवा नष्ट होण्याची भीती आहे.
सद्यपरिस्थितीत पुसद शहर उष्णतेच्या लाटेमुळे होरपळून निघत आहे. दरवर्षी पुसदच्या तापमानात वाढ होत आहे. बास्केट इफेक्टचा परिणाम जाणवत आहे. मात्र मुख्य कारण म्हणजे पुसद परिसरातील नष्ट झालेली वनराई हीच आहे. पुसद शहरासह तालुक्याला पाणीटंचाईचे चटके जाणवत आहे. यासाठी वृक्षरोपण महत्वपूर्ण उपाय ठरू शकतो. परंतु वृक्षरोपनाचे काम होते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही.
वृक्षांची कत्तल योजनाबद्ध
वृक्षाचे जतन करण्यासाठी शासनाने नियम केले आहे. इतकेच नव्हते तर या नियमांची अंमलबजावणी योग्य तºहेने व्हावी म्हणून वन विभागाची निर्मिती केली आहे. परंतु वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जबाबदारीची जाणीवच दिसत नाही. पुसद परिसरातील वृक्षाची कत्तल अतिशय योजनाबद्ध पद्धतीने सुरु आहे. या परिसरात मोजक्याच आरा मशीन आहे. तेथे फक्त दाखविण्यासाठी परवानगीचे काही लाकडे कटाईसाठी ठेवले जातात. परंतु वृक्षांचा बळी घेऊन अवैधपणे आरा मशीनवर कटाईचे प्रमाण कमी नाही. अगदी हजारो वृक्षांची कटाई अशाच पद्धतीने केली जात आहे.