कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला! दोन वर्षांपासून उष्माघाताच्या बळींची संख्या शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 08:16 PM2021-05-18T20:16:25+5:302021-05-18T20:16:56+5:30
Yawatmal news दरवर्षी उन्हाळा आल्यानंतर आरोग्य विभागाला प्रारंभी उष्माघात कक्षाची निर्मिती करावी लागते. मात्र, गत दोन वर्षांमध्ये आरोग्य विभागाला असा कक्ष उघडण्याची आवश्यकताच पडली नाही. या काळात उष्माघाताचे बळी गेले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दरवर्षी उन्हाळा आल्यानंतर आरोग्य विभागाला प्रारंभी उष्माघात कक्षाची निर्मिती करावी लागते. मात्र, गत दोन वर्षांमध्ये आरोग्य विभागाला असा कक्ष उघडण्याची आवश्यकताच पडली नाही. या काळात उष्माघाताचे बळी गेले नाहीत.
२०१८ मध्ये जिल्ह्यात उष्माघाताचे ४९ बळी होते. २०१९ मध्ये ही संख्या ५२ वर गेली. २०२० आणि २०२१ या वर्षांमध्ये उष्माघाताच्या बळींची संख्या निरंक झाली आहे.
कोरोनाचा प्रकोप थांबविण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले. याच काळात ऊनही तापले. लाॅकडाऊनमुळे सर्व नागरिक घरातच होते. परिणामी उष्माघातासारख्या भीषण प्रकोपापासून नागरिकांचा बचाव झाला. २०२१ मध्ये मार्च महिन्यापासूनच ऊन ४० अंश सेल्सिअसपासून ४३ अंशांपर्यंत पोहोचले. उन्हाचा हा चटका सर्वसामान्य नागरिकाला सहन होणारा नाही. अशा स्थितीत विसाव्याने नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून स्वत:चा बचाव करता आला. यामुळे इतरांचे प्राण वाचले आहेत, तर आरोग्य व्यवस्थेवरील वाढलेला ताण रुग्ण नसल्याने आपसूकच कमी झाला आहे. यामुळे पूर्ण क्षमतेने आरोग्य यंत्रणेला कोविडच्या क्षेत्रात काम करता आले.
ऊन वाढले तरी...
उन्हाचा पारा सतत वर चढत आहे. यवतमाळचे तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. उष्णतेची लाट कायम असतानाही उष्माघाताने कुणाचा बळी गेला, अशी कुठलीही नोंद गेल्या दोन वर्षात जिल्ह्यामध्ये झाली नाही. कोविडमुळे लाॅकडाऊन असल्याने सर्व जण घरातच वास्तव्याला आहेत. यातून उष्माघाताचा प्रकोप झाला नाही.
उन्हाळा घरातच !
जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. याचा परिणाम पिकांवर झाला. पिकाचे उत्पादन घटले. मात्र, याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे बंद केले. नंतरच्या काळात लाॅकडाऊन जाहीर झाले. ठरावीक वेळ त्यासाठी देण्यात आला. यामुळे मर्यादित काळासाठी बाहेर आणि नंतर दिवसभर घरातच असे संपूर्ण चित्र पाहायला मिळाले. याचा परिणाम इतर आजार न होण्यावर झाला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघाताचा प्रकोप थांबविण्यासाठी कक्ष उघडला जातो.
आरोग्य यंत्रणा प्रत्येक आजारासाठी सज्ज आहे. दरवर्षी उष्माघाताचा प्रकोप होतो. यामुळे अशा रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्यात येते. कोरोनामुळे उष्माघाताचे बळी थांबले. या काळात नागरिक सुरक्षितता म्हणून घरातच होते. यातून उन्हापासून नागरिकांचा बचाव झाला आहे.
- डाॅ. हरी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ