राज्यघटना बदलण्याचे दलित समाजात भय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:44 PM2018-09-07T23:44:22+5:302018-09-07T23:45:15+5:30
देशात काही जणांकडून राज्यघटना बदलण्याची वक्तव्ये केली जात आहे. मात्र देशभरातून याला विरोध झाल्यानंतर आता चर्चा थांबली. तथापि दलितांमधील भय अद्याप संपलेले नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेवराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : देशात काही जणांकडून राज्यघटना बदलण्याची वक्तव्ये केली जात आहे. मात्र देशभरातून याला विरोध झाल्यानंतर आता चर्चा थांबली. तथापि दलितांमधील भय अद्याप संपलेले नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेवराव गायकवाड यांनी व्यक्त केले. ते दारव्हा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग होते. प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, ज्येष्ठ नेते अॅड.शंकरराव राठोड, उत्तमराव शेळके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, पंडित कांबळे, हरीश कुडे, सुभाष भोयर मंचावर उपस्थित होते. आमदार गायकवाड म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व समाज घटकांना समोर ठेवून राज्यघटना तयार केली. त्याच आधारावर देश चालतो. परंतु अलीकडे राज्यघटनेला धक्का लावण्याचे वक्तव्य केले जात आहे. केंद्र राज्य सरकारची चार वर्षांची ही वाटचाल सर्वांना अस्वस्थ करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदार ख्वाजा बेग यांनी जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून प्रत्येक विंगमधील चांगले कार्यकर्ते शोधून त्यांना बळ देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. वसंतराव घुईखेडकर, उत्तमराव शेळके, क्रांती राऊत, पंडित कांबळे यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी आमदारव्दय गायकवाड व बेग यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन तालुक अध्यक्ष प्रा.चरण पवार, तर आभार सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शेषराव राठोड यांनी मानले. मेळाव्याला शहराध्यक्ष नासीर शेख, प्रा.सुभाष गावंडे, महिला तालुकाध्यक्ष गोदावरी पाटील, शहर अध्यक्ष नलिनी राठोड, युवक तालुका अध्यक्ष अॅड.मनमोहन ठाकरे, शहराध्यक्ष सादीक शेख, रामदास राऊत, सचिन ठाकरे, नेर तालुकाध्यक्ष युवराज अर्मळ, शहराध्यक्ष तन्वीर खान, दिग्रस तालुकाध्यक्ष लालसिंग राठोड, उमरखेड अध्यक्ष शंकर तालंगकर आदी उपस्थित होते.