लायसन्स बाद होण्याची भीती; 30 सप्टेंबरपर्यंतचा कोटा फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 05:00 AM2021-09-23T05:00:00+5:302021-09-23T05:00:12+5:30
आरटीओच्या ऑनलाईन साईटवर ३० सप्टेंबरपर्यंतचीच अपाॅईंटमेंट देण्यात आली आहे. त्या पुढच्या तारखा मिळत नाहीत. त्यामुळे शिकाऊ परवाना रद्द होण्याची भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. आता हा परवाना वाचविण्यासाठी पुन्हा शुल्क भरून तो रिन्यूअल करावा लागणार आहे. यासाठीचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तर परिवहन विभागाला यातून मोठी रक्कम प्राप्त होत आहे. गैरसोय टाळण्यासाठी धडपड सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिकाऊ परवान्याची मुदत संपलेली आहे. तो नियमित करण्यासाठी अपाॅईंटमेंट मिळत नाही. दुसरीकडे रस्त्यावर वाहन चालविताना वाहतूक पोलिसांकडून तपासणी केली जाते. मुदत संपलेला परवाना दाखवूनही ते ऐकत नाहीत. थेट दंडाच्या पावत्या दिल्या जातात. असा फटका अनेकांना बसत आहे.
आरटीओच्या ऑनलाईन साईटवर ३० सप्टेंबरपर्यंतचीच अपाॅईंटमेंट देण्यात आली आहे. त्या पुढच्या तारखा मिळत नाहीत. त्यामुळे शिकाऊ परवाना रद्द होण्याची भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. आता हा परवाना वाचविण्यासाठी पुन्हा शुल्क भरून तो रिन्यूअल करावा लागणार आहे. यासाठीचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तर परिवहन विभागाला यातून मोठी रक्कम प्राप्त होत आहे. गैरसोय टाळण्यासाठी धडपड सुरू आहे.
काय आहेत अडचणी ?
वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे परवाना मिळावा याकरिता दररोज अर्ज केले जातात.
कोरोना संसर्गाच्या निर्बंधामुळे जवळपास दीड वर्ष परवाना देण्याची प्रक्रिया बंद होती.
शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थी परवाना घेण्यासाठी धडपडत आहेत. या कारणांमुळे एकाच वेळी गर्दी वाढली आहे.
तारीख मिळालेले येत नाहीत, येणाऱ्यांना तारीख मिळत नाही
शिकाऊ परवाना नियमित करण्यासाठी मोटर वाहन निरीक्षकांपुढे वाहन चालविण्याचे प्रात्यक्षिक द्यावे लागते. त्यात उत्तीर्ण झालेल्याला नियमित परवाना मिळतो. ज्यांना तारीख मिळाली ते प्रात्यक्षिक देण्यासाठी येण्याचे टाळतात. मात्र, यामुळे वेटिंग लिस्ट वाढत चालली आहे.
रोजचा कोटा ५०
एका मोटर वाहन निरीक्षकाला नियमित परवाना देण्यासाठी दिवसाला ५० जणांचे प्रात्यक्षिक घेण्याचा कोटा निश्चित केला आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी वाढत असून अपाॅईंटमेंट मिळणे बंद झाले आहे.
लायसन्स नव्याने काढावे लागणार की काय?
कोरोना काळात लायसन्स मिळणे बंद होते. आता बाहेर फिरताना लायसन्स मागितले जाते. त्यासाठी शिकाऊ लायसन्स काढले आहे. मात्र, ते नियमित करण्यासाठी ऑनलाईन अपाॅईंटमेंट मिळत नाही.
- यश भोयर, यवतमाळ
ऑनलाईन प्रक्रियेनंतरही वाहन चालविण्याचा परवाना काढणे खर्चिक झाले आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्तीला वारंवार जिल्ह्याच्या मुख्यालयी चकरा मारणे परवडत नाही. आता अपाॅईंमेंटच मिळत नाही. - सदानंद वाघमारे, मोझर
शिकाऊ लायसन्स होतेय रिन्यूअल
लर्निंग लायसन्सची मुदत संपली असली तरी पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही. केवळ ऑनलाईन अर्ज करून तेच लायसन्स रिन्यूअल करता येते. नंतर नियमित लायसन्ससाठी पुढची अपाॅईंटमेंट घ्यावी. - दीपक गोपाळे, सहायक परिवहन अधिकारी.