शालेय विद्यार्थ्यांच्या ताटातून तूर डाळ गायब
By Admin | Published: December 28, 2015 02:54 AM2015-12-28T02:54:48+5:302015-12-28T02:54:48+5:30
राज्य शासन सर्वसामान्यांना स्वस्त तूरडाळ देण्याचा दावा करीत असतानाच शालेय पोषण आहारातून तूरडाळ मात्र महागाईमुळे गायब झाली आहे.
नोव्हेंबरपासून पुरवठा बंद : शालेय पोषण आहाराला महागाईचा फटका
यवतमाळ : राज्य शासन सर्वसामान्यांना स्वस्त तूरडाळ देण्याचा दावा करीत असतानाच शालेय पोषण आहारातून तूरडाळ मात्र महागाईमुळे गायब झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांसाठी आलेल्या पोषण आहाराच्या कोट्यात तूरडाळच नाही. त्यामुळे वरण-भात या आवाडत्या आहारापासून शोलय विद्यार्थी वंचित आहेत.
जिल्ह्यातील २ हजार १०९ शाळांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात पोषण आहारासाठी जे धान्य पुरविण्यात आले, त्यात तूरडाळीचा पत्ताच नाही. महागाईमुळे तूरडाळ देण्यात आली नसल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. परंतु, तूरडाळ वजा करताना त्याऐवजी दुसरा कुठलाही पदार्थ वाढविण्यात आलेला नाही, त्यामुळे मुख्याध्यापक-शिक्षकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरवेळी येणाऱ्या मूगडाळीमध्ये किंचतशी वाढ करण्यात आली आहे. परंतु, तूरडाळीच्या वरणासोबत भात आवडीने खाणारे विद्यार्थी मूगडाळीकडे बघायला तयार नाही, त्यामुळे आहार शिजविणाऱ्यांची मात्र गोची होत आहे.
शाळांमध्ये पोषण आहार देण्याविषयी आठवडाभराचे वेळापत्रक शासनानेच ठरवून दिले आहे. त्यानुसार प्रत्येक सोमवारी विद्यार्थ्यांना तूरडाळीचे वरण देणे बंधनकारक आहे. सोमवारी तूरडाळ, मंगळवारी वाटाणे, बुधवारी मूगडाळ, गुरुवारी वाटाणे, शुक्रवारी चवळी, शनिवारी वाटाणे देण्याचा शिरस्ता नोव्हेंबरपर्यंत कायम होता. मात्र, नोव्हेंबरच्या कोट्यात तूरडाळच न आल्याने सोमवारच्या आहारात काय द्यावे, हा प्रश्न आहे. नाईलाजाने शिक्षक दररोजच्या आहारात विद्यार्थ्यांना मूगडाळ किंवा वाटाणेच देत आहेत. विद्यार्थ्यांचा आवडता वरण-भात मिळत नसल्याने शिक्षकांना प्रसंगी पदरमोड करून तूरडाळ घ्यावी लागत आहे. होतकरू शिक्षकांना त्यासाठी आर्थिक चणचण भोगावी लागत आहे.
बाजारपेठेत तूर डाळीचे किरकोळ विक्रीचे दर सध्या १८० रुपये किलोप्रमाणे आहे. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे दर गेले आहेत. ग्रामीण भागातील शेतमजुरांच्या मुलांना आपल्या घरातही तूर डाळीचा आस्वाद घेणे महागाईमुळे दुर्लभ झाले आहे. शाळेतील पोषणहारात मात्र त्यांना तूर डाळीचे आवडते वरण हमखास मिळत होते. मात्र आता पोषण आहाराच्या कोट्यातही तूरडाळ वगळण्यात आल्याने तूरडाळीच्या ऐवजी मूग डाळीच्या वरणावर त्यांचे भलावण केली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पोषण आहाराचा कंत्राट वर्षभरापूर्वीचा आहे. त्यावेळच्या बाजारातील दरानुसारच प्रतिलाभार्थी खर्च ठरलेला आहे. त्याच्या आधीन राहूनच विद्यार्थ्यांना धान्य पुरविले जाते. रोज प्रत्येक विद्यार्थ्याला २० ग्रॅम धान्य देणे आवश्यक आहे. या निकषामध्ये सध्याच्या भावानुसार तूरडाळ बसत नाही. मात्र या पुढील कोट्यामध्ये तूरडाळीचा समावेश करण्याचा प्रयत्न राहील.
- राजेश मनवर
अधीक्षक, शालेय पोषण आहार