धक्कादायक! अत्याचाराला कंटाळून ६० पारधी कुटुंबे गेली जंगलात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 09:07 AM2022-03-29T09:07:27+5:302022-03-29T09:08:16+5:30
महिनाभरापासून सोडले गाव : रोजगार, अन्न-पाण्यावाचून होताहेत मुला-बाळांचे हाल
अविनाश साबापुरे
यवतमाळ : गावकऱ्यांच्या अनन्वित अत्याचारांना कंटाळून ६० पारधी कुटुंबांना गाव सोडून पलायन करावे लागले. ते सर्वजण मुला-बाळांसह महिनाभरापासून जंगलात तलावाच्या काठावर जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आता तलावही आटल्याने त्यांची उपासमार सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
महागाव तालुक्याच्या माळवाकद गावात हा प्रकार उघडकीस आला. येथे अनेक पारधी समाज बांधव आहेत. आरक्षणामुळे पारधी समाजाच्या एका तरुणाकडे सरपंच पदही आले होते. मात्र, त्याला मारहाण केली गेली. गावातील काही दारुड्या नागरिकांचा पारधी महिलांना त्रास वाढला आहे. महिनाभरापूर्वी या लोकांनी गावच सोडून दोन किलोमीटरवर जंगलात पाझर तलावाच्या बाजूला आसरा घेतला. ही माहिती कळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी भेट देऊन पारधी महिलांशी संवाद साधला. त्यावेळी महिलांनी त्यांच्यावरील अत्याचाराची
कहाणीच मांडली.
जिल्हा कचेरीवर धडक
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ प्रदेश महासचिव डॉ. आरती फुपाटे यांनी अन्यायग्रस्तांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तातडीने हस्तक्षेप करून किमान सोयी पुरवाव्यात, अशी मागणी केली.
शनिवारी तक्रारीनंतर उमरखेड एसडीओ व पुसद आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. अहवाल आल्यावर कार्यवाही केली जाईल.
- अमोल येडगे, जिल्हाधिकारी