मेडिकलमध्ये प्रसुतीदरम्यान महिलेचा मृत्यू
By admin | Published: April 21, 2017 02:12 AM2017-04-21T02:12:06+5:302017-04-21T02:12:06+5:30
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील २७ वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर
यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील २७ वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर अवघ्या काही तासातच अतिरिक्त रक्तस्रावाने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजता घडली.
रत्नमाला सुभाष आत्राम (२७), असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेची बुधवारी सामान्य प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र नंतर तिच्याकडे डॉक्टरांनी फिरकूनही पाहिले नाही. नंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. तिची प्रकृती गंभीर झाली. यातच तिचा काही तासातच मृत्यू झाला. तिचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला. त्याचा अहवालसुद्धा पाठविण्यात आला नाही. रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप रत्नमालाच्या नातेवाईकांनी केला. त्याबाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसूतीदरम्यान सतत मृत्यू होत असल्याने येथील डॉक्टरांच्या सेवेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.