खतांच्या किमतीत होणार वाढ, शेतकऱ्यांवर आर्थिक भार, लिंकिंग थांबविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 18:17 IST2024-12-25T18:15:00+5:302024-12-25T18:17:14+5:30

आर्थिक कोंडीने शेतकरी हैराण : शेती करायची तरी कशी ?

Fertilizer prices will increase, financial burden on farmers, demand to stop linking | खतांच्या किमतीत होणार वाढ, शेतकऱ्यांवर आर्थिक भार, लिंकिंग थांबविण्याची मागणी

Fertilizer prices will increase, financial burden on farmers, demand to stop linking

लोकमत न्यूज नेटवर्क 
वणी :
रासायनिक खतांच्या किमती आधीच जास्त असताना, खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून दरवाढ जाहीर केली. शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.


शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विक्री थांबवली होती; मात्र, उलट दर कमी झाले. खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत. उदाहरणार्थ, डीएपी (डाय- अमोनियम फॉस्फेट) खताची किंमत प्रति पिशवी १ हजार ३५० रुपयांवरून १ हजार ५९० रुपयांवर गेली आहे. टीएसपी ४६ टक्के (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खताची किंमत एक हजार ३०० रुपयांवरून एक हजार ३५० रुपयांवर वाढली आहे. १०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमती १ हजार ४७० रुपयांवरून १ हजार ७२५ रुपयांवर वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत, शेतकरी वर्गातून खतांच्या किमती वाढवण्याऐवजी कमी करण्याची मागणी होत आहे.


त्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य बाजारभाव मिळावा, तसेच शेतीसाठी आवश्यक इनपुट्सच्या किमती नियंत्रणात ठेवाव्यात, अशी त्यांची अपेक्षा आहे. एकीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असताना, दुसरीकडे नवीन वर्षात खताचे भाव वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आम्ही शेती करायची, तरी कशी, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 


"रासायनिक खत कंपन्याचे दर अगोदरच जास्त आहेत. दर वाढवल्यामुळे शेतकरी चारऐवजी दोनच बॅग घेईल. शेतमालाला भाव नसल्याने सध्या बाजारपेठ थंडावली आहे. १०: २६: २६ ची उपलब्धता नाही. रासायनिक खताबरोबरची लिंकिंग थांबली पाहिजे." 
- सागर धवणे, उपाध्यक्ष, कृषी साहित्य विक्रेता असोसिएशन.


"शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला आहे. रासायनिक खताचे दर अगोदरच जास्त आहेत. त्यात पुन्हा किमती वाढून शेतकऱ्यांना अधिकचा भुर्दड बसणार आहे." 
- दिलीप अलोणे, शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी


"रासायनिक खताच्या अधिकच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांनी पर्यायी मार्ग म्हणून सेंद्रिय खत व बायोखत यावर भर द्यावा. रासायनिक खताबरोबर लिंकिंग मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्याचा भुर्दंड बसत आहे." 
- नितेश ठाकरे, कृषी विक्रेता, वणी

Web Title: Fertilizer prices will increase, financial burden on farmers, demand to stop linking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.