यवतमाळ विधानपरिषदेसाठी शिवाजी सावंत यांची फिल्डींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:00 AM2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:04+5:30

प्रा. शिवाजी सावंत हे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तर भैरवनाथ सहकारी साखर कारखाना अंतर्गत सोनारी, विटाळा, लवंगी आणि वाशी या अनुक्रमे युनिट १ ते ४ चे उपाध्यक्ष आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे रहिवासी असलेले प्रा. शिवाजी सावंत यांची राजकीय कारकीर्द २००२ मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या मानेगाव गटातून सुरू झाली. ते शिवसेनेकडून तेथे विजयी झाले होते.

Fielding of Shivaji Sawant for Yavatmal Legislative Council | यवतमाळ विधानपरिषदेसाठी शिवाजी सावंत यांची फिल्डींग

यवतमाळ विधानपरिषदेसाठी शिवाजी सावंत यांची फिल्डींग

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेचा दावा कायम : उर्वरित चार वर्षे भावाकडे वळते करणार काय?

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून जाताच त्यांची विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील उर्वरित चार वर्षे मिळविण्यासाठी प्रा. तानाजींचे मोठे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांनी फिल्डींग लावली आहे.
यवतमाळातून प्रा. तानाजी सावंत ५ डिसेंबर २०१६ ला विधानपरिषदेवर निवडून गेले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमपरांडा मतदारसंघातून शिवसेनेकडून विजयी झाले. त्यामुळे त्यांची यवतमाळातील विधानपरिषदेची जागा रिक्त झाली. या जागेसाठी जिल्ह्यातील सहकार, शासकीय कंत्राटदार, बीअरबार व्यावसायिक तथा पुण्यातील उद्योजक, शिवसेनेचे पराभूत उमेदवार व अनेक राजकीय मंडळींनी मोर्चेबांधणी चालविली आहे. परंतु प्रत्यक्षात आणखी साडेतीन-चार वर्षे शिल्लक असलेल्या यवतमाळ विधानपरिषदेच्या जागेवर सावंत परिवारातील सदस्यच दावा करणार आहे. यवतमाळच्या या जागेची मुदत ५ डिसेंबर २०२२ ला संपणार आहे. आणखी साडेतीन-चार वर्ष उरलेली आहेत. त्यामुळे ही जागा इतरांना जाऊ न देता घरातच कायम ठेवण्याचा विचार सावंत परिवारात सुरू असल्याचे सांगितले जाते. यातूनच प्रा. तानाजी यांचे ज्येष्ठ बंधू प्रा. शिवाजी जयवंत सावंत यांनी यवतमाळच्या विधानपरिषदेच्या जागेवर लक्ष केंद्रीत केले आहे.
प्रा. शिवाजी सावंत हे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तर भैरवनाथ सहकारी साखर कारखाना अंतर्गत सोनारी, विटाळा, लवंगी आणि वाशी या अनुक्रमे युनिट १ ते ४ चे उपाध्यक्ष आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे रहिवासी असलेले प्रा. शिवाजी सावंत यांची राजकीय कारकीर्द २००२ मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या मानेगाव गटातून सुरू झाली. ते शिवसेनेकडून तेथे विजयी झाले होते. २००४ मध्ये त्यांनी माढातून विधानसभा लढविली. दरम्यान २००७ ला सावंत बंधूंनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत घरठाव केला. ते सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे नेते झाले. मात्र तेथे मन न रमल्याने सावंत बंधूंची २००९ ला घरवापसी झाली. ते पुन्हा सेनेत सक्रिय झाले. २००४, २००९, २०१४ अशा तीन विधानसभा निवडणुका प्रा. शिवाजी सावंतांनी सेनेकडून लढल्या. मात्र ते पराभूत झाले. आमदार होण्याची महत्वाकांक्षा ते बाळगून आहेत. त्यामुळेच त्यांनी आता यवतमाळची विधानपरिषद कायम ठेवण्यासाठी फिल्डींग लावली. प्रा. शिवाजी हे २००९ पासून आतापर्यंत सोलापूरचे सेनेचे संपर्क प्रमुख आहे.

सुकामेवा वाटपाने ‘जमीन गैरव्यवहार’ही चर्चेत
एकूणच विधानपरिषद निवडणुकीत पैसाच निर्णायक ठरणार आहे. या निवडणुकीसाठी अनेक चेहरे चर्चेत आहे. त्यापैकीच सुकामेवा वितरित करणारा एक इच्छुक चर्चेत आला. मात्र त्याची ओळख पटताच त्याच्या जुन्या भानगडीही एकापाठोपाठ पुढे आल्या. काही वर्षांपूर्वी या इच्छुकाने चापर्डा गावाच्या परिसरात कुळाच्या जमिनींचे व्यवहार केले होते. नाममात्र रकमेत आदिवासींची दिशाभूल केली गेली. पुढे याच जमिनी जादा दराने समाज कल्याण विभागामार्फत शासनाला विकल्या गेल्या. समाज कल्याणच्या जमीन खरेदी घोटाळ्याची आजही येथील आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. यातील काही आरोपींना अलिकडेच अटक झाली. या व्यवहारातील पैशातूनच पुढे बीअरबारचा व्यवसाय फोफावला. एकेकाळी येथील एका राजकीय नेत्याच्या दुकानात काम करणारा व्यक्ती अचानक विधानपरिषद निवडणुकीच्या तयारीचे संकेत देत असल्याने त्याला आधीपासून ओळखणाऱ्यांचे मात्र डोळे विस्फारले आहे.

भाजप, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी नाराज
यवतमाळ विधानपरिषदेसाठी प्रा. शिवाजी सावंत यांच्या नावाची चर्चा असली तरी भाजप, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना हे नाव चालेल का याबाबत साशंकता आहे. कारण मुळात मतदार असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा तानाजींवर रोष आहे. विधानपरिषदेची निवडणूक जिंकून गेलेले तानाजी परत यवतमाळात आलेच नाही. शिवाय त्यांचा विकास निधी मतदार असलेल्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचलाच नाही. गेली तीन वर्ष या निधीची सूत्रे यवतमाळातील विशिष्टच व्यक्तींच्या हाती होती. निवडणुकीच्या वेळी झालेल्या व्यवहारांबाबतही पारदर्शकता राहिली नसल्याची ओरड ऐकायला मिळते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा सावंत बंधूंना मतदार पसंती दर्शवितील का? याबाबत साशंकता आहे.
सावंतांची एन्ट्री झाल्यास मिळणार ‘बुस्ट’
सावंतांची एन्ट्री झाल्यास काहींनी निवडणुकीचा झालेला खर्च काढण्याची तर मतदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या आगामी निवडणुकीसाठी आर्थिक तजवीज करून घेण्याची व्यूहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळात तीन वेगवेगळ्या पक्षातील ‘अनुभवी’ नगरसेवक एकत्र आले आहे. त्यांनी मतदारांचा वेगळा गट तयार करून त्यांच्यामार्फत व्यवहार करण्याची व नेत्यांना दूर ठेवण्याची योजना तयार केल्याचे सांगितले जाते. या अनुषंगाने सदर नगरसेवकांनी आपल्या सहकारी मतदार बांधवांच्या भेटी-गाठी घेऊन प्राथमिक माहितीही त्यांना दिली आहे.

Web Title: Fielding of Shivaji Sawant for Yavatmal Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.