भावना गवळींचा पाचव्यांदा अर्ज, आदित्य ठाकरेंचे हेलिकॉप्टरने लॅण्डींग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 06:10 PM2019-03-25T18:10:32+5:302019-03-25T18:11:30+5:30
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, अनिल देसाई यांची उपस्थिती
यवतमाळ : गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांनी यावेळी सलग पाचव्यांदा खासदार होण्यासाठी सोमवारी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
भावना गवळी दोन टर्म वाशिम तर दोन टर्म यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या सदस्य आहेत. 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकल्यास त्यांची ही पाचवी टर्म राहू शकते. त्यांच्या नामांकनासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई अमरावतीवरून हेलिकॉप्टरने यवतमाळात पोहोचले. यावेळी भाजपा-शिवसेनेचे मंत्री, आमदार, जिल्हा प्रमुख उपस्थित होते. रॅलीद्वारे त्यांनी शक्तीप्रदर्शन केले.
भाजपा बंडखोराचे आव्हान
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या एका बंडखोर उमेदवाराने नामांकन दाखल केल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. या बंडखोराला भाजपाच नव्हे तर सेनेतील दुसºया गटाचे छुपे पाठबळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भावना गवळींपुढे आधी पक्ष व युतीतील बंड थंड करण्याचे आव्हान राहणार आहे.