शिष्यवृत्तीचे पाच कोटी अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:15 AM2017-07-25T01:15:50+5:302017-07-25T01:15:50+5:30
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीत संकेतस्थळाचा अडसर निर्माण झाला आहे.
१२ हजार विद्यार्थी : दीड महिन्यांपासून संकेतस्थळात तांत्रिक बिघाड
रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीत संकेतस्थळाचा अडसर निर्माण झाला आहे. गत दीड महिन्यांपासून शासनाचे संकेतस्थळ बंद पडल्याने एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील १२ हजार पात्र विद्यार्थ्यांचे तब्बल पाच कोटी रुपये अडले आहेत. १ आॅगस्टपासून महा-डीबीटी हे संकेतस्थळ सुरू होणार असल्याने त्यानंतरच रखडलेल्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातून शिष्यवृत्तीसाठी ५१ हजार २०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती संवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी ३७ हजार ९७६ विद्यार्थ्यांना ५१ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली. मात्र सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे गत दीड महिन्यांपासून संकेतस्थळच बंद आहे. तसेच महाविद्यालयाकडून या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव येण्यासही विलंब झाला. पूर्वी मास्टेक कंपनीच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करावी लागत होती. मात्र या कंपनीचा करार संपला. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली. आता यावर तोडगा काढण्यासाठी महा-डीबीटी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १ आॅगस्टपासून हे संकेतस्थळ कार्यान्वित होणार आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. मात्र तोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शिष्यवृत्तीसाठी आता नवे महा-डीबीटी
तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होतो. हा प्रकार टाळण्यासाठी आता समाजकल्याण विभाग १ आॅगस्टपासून महा-डीबीटी (महाराष्ट्र डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सपर) या संकेत स्थळ सुरू करणार आहे. या संकेत स्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करणे बंधनकारक होणार आहे. जुन्या संकेतस्थळापेक्षा या नवीन संकेतस्थळात आमुलाग्र बदल करण्यात आले असून विद्यार्थ्यांना थेट शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. ट्रेझरीमध्ये बिल पोहोचताच पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.