विद्यार्थीच बनले एकमेकांचे शत्रू; क्षुल्लक कारणावरून दोन गटात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 05:14 PM2022-01-03T17:14:06+5:302022-01-03T18:31:36+5:30

लहान सहान कारणांवरुन विद्यार्थ्यांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. वणीत सोमवारी सकाळी रेल्वे गेटलगत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत चांगलीच हाणामारी झाली. हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असून, याच मार्गावर असलेल्या एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहेत.

fight between two groups of students in wani, Dispute until the head breaks | विद्यार्थीच बनले एकमेकांचे शत्रू; क्षुल्लक कारणावरून दोन गटात राडा

विद्यार्थीच बनले एकमेकांचे शत्रू; क्षुल्लक कारणावरून दोन गटात राडा

googlenewsNext
ठळक मुद्देपालक आणि शिक्षकांचेही दुर्लक्ष, अप्रिय घटनेची भीती

यवतमाळ : अगदी क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडण्याचे प्रकार वणी शहरात वाढले आहेत. नांदेपेरा मार्गावर एक दिवसाआड अशी भांडणे पाहायला मिळत आहेत. एकमेकांचे डोके फुटेपर्यंत हा वाद विकोपाला जात असून, यातून एखादी मोठी अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सोमवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास रेल्वे गेटलगत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत चांगलीच हाणामारी झाली. भांडणाचे कारण मात्र कळू शकले नाही. हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असल्याचे सांगितले जात असून, याच मार्गावर असलेल्या एका नामांकित शाळेत ते शिक्षण घेत आहेत. प्रेम प्रकरणातून अशा हाणामारीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये इतका आक्रस्ताळेपणा येतो कुठून, हा पालकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. शाळेमध्ये क्षुल्लक कारणावरून शाब्दिक वाद होतात. शाळा सुटल्यानंतर रस्त्याने घराकडे परत जात असताना याच कारणावरून पुन्हा वाद उफाळून येतो आणि त्यातून हाणामारीचे प्रकार घडत आहेत.

२१ डिसेंबरला याच मार्गावर रेल्वे गेटजवळ नवव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात भीषण हाणामारी झाली होती. यात एकाचे डोके फुटून त्याला तीन टाके पडले होते. दुसऱ्याही गटातील विद्यार्थी जखमी झाला होता. घटना घडताच, संबंधित शाळेतील शिक्षकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमी विद्यार्थ्याला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारानंतर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. रीतसर तक्रारही करण्यात आली. परंतु काही वेळानंतर दोन्ही कुटुंबात तडजोड होऊन प्रकरण मागे घेण्यात आले.

त्यानंतर सोमवारी पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाली. यावेळी मात्र भांडण करणारे हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ज्या शाळेत हे विद्यार्थी शिकत आहेत त्या शाळेकडून विद्यार्थ्यांना शिस्त लावली जात नाही का, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मुलांना शाळेत पाठवून पालक होतात बिनधास्त

आपली मुले शाळेत गेल्यानंतर नेमके काय करतात, याकडे पालकांचे कायम दुर्लक्ष असते. या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र वणी शहरात पाहायला मिळते. मुलगा शाळेत गेला म्हणजे तो शिस्तीत आहे, अशा भ्रामक कल्पनेत पालक राहतात. यातूनच विद्यार्थ्यांना मोकळेपणा येतो आणि अशा घटना घडतात.

Web Title: fight between two groups of students in wani, Dispute until the head breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.