न्याय हक्कासाठी संस्था, संघटनांचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:09 PM2017-12-15T22:09:53+5:302017-12-15T22:10:26+5:30
विविध प्रश्नांना घेऊन शुक्रवारी संघटना, संस्थांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले. कुंभार समाज, भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (नफ) संघटना आदींनी विविध विषय प्रशासनाकडे मांडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विविध प्रश्नांना घेऊन शुक्रवारी संघटना, संस्थांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले. कुंभार समाज, भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (नफ) संघटना आदींनी विविध विषय प्रशासनाकडे मांडले.
कुंभार समाज महासंघ
कुंभार समाज महासंघाने आपल्या मागण्या प्रशासनाकडे मांडल्या. मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा आदी राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही स्वतंत्र मातीकला बोर्ड स्थापन करावे, उदरनिर्वाहासाठी भटकंतीचे जीवन जगणाºया या समाजाचा भटक्या विमुक्त जमाती (एनटी) या प्रवर्गात समावेश करावा, वीट, व्यवसायासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, संत शिरोमणी गोरोबाकाका यांचे जन्मगाव तेर (जि.उस्मानाबाद) या गावाचा सर्वांगीण विकास करावा, तेर तीर्थक्षेत्रास अ दर्जा देण्यात यावा, मातीवरील रॉयल्टी माफी व समाजातील वीट व्यावसायिकांना आवश्यक परवान्याबाबतचे स्पष्ट निर्देश संबंधित प्रशासनाला देण्यात यावे, समाजातील ५० वर्षांवरील कारागिरांना मासिक तीन हजार रुपये मानधन द्यावे, एमआयडीसी क्षेत्रात कुंभार व्यावसायिकांना अग्रक्रमाने जागा देण्यात यावी आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र कुंभार महासंघ महिला आघाडीच्या सरचिटणीस अंजू चिलोरकर, विदर्भ युवा अध्यक्ष विक्की जिल्लडवार, युवा संघटक अमोल मोहबिया, युवा जिल्हाध्यक्ष गंगाधर खंडारे, माधवराव मेहर, दिलीप राजुरकर, संजय तायडे, सुखलाल प्रजापती, राकेश प्रजापती, अशोक अंबाधरे, सुरज पात्रे आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्तांचा बैठा सत्याग्रह
भूविकास बँकेच्या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह केला. या बँकेतील सेवानिवृत्तांनी सेवाग्राम येथे सुरू केलेल्या सत्याग्रहाचा ३४ वा दिवस उजाडला. यानंतरही राज्य शासनाने प्रश्न मार्गी लावला नाही. या सत्याग्रहाच्या समर्थनार्थ येथे सत्याग्रह करण्यात आला.
२००७-२००८ पासून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची देय ग्रॅच्यूईटी, रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त निर्देशांक, महागाई भत्ता त्वरित मिळावा, २०१० पासून स्वेच्छा सेवानिवृत्ती, नियमित सेवानिवृत्ती, ३ आॅगस्ट २०१७ च्या शासन निर्णयानुसार कार्यमुक्त करण्यात आलेल्या सेवानिवृत्तांची ग्रॅच्यूईटी, रजेचे वेतन, नियमित वेतन, स्वेच्छानिवृत्तीची नुकसान भरपाई मिळावी, २००१ ते २००९ या कालावधीत सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांचा प्रलंबित देय अतिरिक्त निर्देशांक महागाईभत्ता त्वरित अदा व्हावा आदी मागण्यांसाठी सत्याग्रह करण्यात आला.
या सत्याग्रहात ए.ए. बाहे, पी.व्ही. देशमुख, पी.टी. चव्हाण, एस.डी. चौधरी, मनिष येंडे, पी.यू. महल्ले, टी.एन. सळमाखे, यू.एल. पाटील, गजानन पाटील आदी सहभागी झाले होते.
‘नफ’ची कचेरीवर धडक
राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (नफ)च्यावतीने विविध प्रश्नांना घेऊन धरणे देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून मागण्यांचे निवेदन सादर केले.
अहमदनगर जिल्ह्याच्या खर्डा येथील नितीन आगे या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला महाविद्यालयातून बाहेर काढून जीवघेणी मारहाण करण्यात आली. त्याला जंगलात नेऊन मृतदेह झाडाला लटकविण्यात आला. या हत्याकांड प्रकरणाचा खटला उच्च व सर्वोच्च न्यायालयात चालविण्यासाठी विशेष तपास अधिकारी नियुक्त करून पुरावे गोळा करावे, खटल्याचा निकाल लागेपर्यंत पीडित कुटुंब व साक्षीदारांना विशेष पोलीस संरक्षण द्यावे, या कुटुंबाला आर्थिक सहाय्य द्यावे, महाराष्ट्रभर झालेल्या अॅट्रॉसिटीच्या केसेसमध्ये विशेष यंत्रणा निर्माण करून पीडितांना जलद गतीने न्याय द्यावा, अॅट्रॉसिटी कायद्याचा लाभ भटक्या विमुक्त जमातींना मिळावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे.
निवेदन देताना माजी सरपंच माया किशोर गजभिये, संदीप मून, विनोद डवले, सुरेंद्र परडखे, विलास गायकवाड, भाग्यश्री तिरमारे, कुणाल वासनिक, प्रभाकर सावळे, हिम्मत भगत आदींची उपस्थिती होती.
पळसवाडीतील अतिक्रमणग्रस्तांच्या उपोषणाचा ११ वा दिवस उजाडला
यवतमाळ : येथील पळसवाडी कॅम्प परिसरातील १२ कुटुंबांची घरे पाडण्यात आली. उघड्यावर आलेल्या या कुटुंबांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाचा शुक्रवारी ११ वा दिवस उजाडला आहे. घरातील चिल्यापिल्यांसह हे कुटुंब उपोषणाला बसले आहे. मंडपातच स्वयंपाक करून तेथे लेकरांना जेवण घातले जात आहे. यानंतरही प्रशासनाकडून त्यांची व्यथा समजून घेतली जात नाही. पर्यायी जागेसाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे. जनहित माझे गाव संघटनेचे विलास झेंडे, शंकर भोंगे, पारस अराठे, नीलेश ठाकूर आदींनी या उपोषणकर्त्यांचे प्रश्न उपोषण मंडपाला भेट देऊन जाणून घेतले. हक्काची जागा मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, अशी भूमिका घेतली असल्याचे गणेश भांडवले, राजू गवळी, सुरज लोंढे, वैभव वासनिक, संजय वानखडे यांनी सांगितले.