पांढरकवडा बाजार समितीची फाईलबंद
By admin | Published: January 15, 2015 10:59 PM2015-01-15T22:59:50+5:302015-01-15T22:59:50+5:30
पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेवानिवृत्तांना नेमणुका देण्याच्या प्रकरणावर जिल्हा उपनिबंधकांनी पडदा टाकला असून फाईलीचा सोक्षमोक्ष लावला आहे. मात्र बाजार समितीच्या माजी
यवतमाळ : पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेवानिवृत्तांना नेमणुका देण्याच्या प्रकरणावर जिल्हा उपनिबंधकांनी पडदा टाकला असून फाईलीचा सोक्षमोक्ष लावला आहे. मात्र बाजार समितीच्या माजी उपसभापतींनी हे प्रकरण थेट पणन संचालकांच्या दरबारात नेण्याचे सूतोवाच केले आहे.
पांढरकवडा बाजार समितीचे माजी उपसभापती अभय डोंगरे यांनी तक्रार केली आहे. बाजार समितीने विजय बोंद्रे आणि विनायक बेजंकीवार या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना २२ आॅक्टोबर २०११ रोजी अनुक्रमे सचिव आणि मापारी पदावर नेमणूक दिली. ही नेमणूक नियमबाह्य आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारी असल्याचे नमूद करीत डोंगरे यांनी सहायक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र सहकार प्रशासनाने नोटीस काढणे आणि रद्द करणे एवढीच कारवाई केली.
यापूर्वीच्या उपनिबंधकांनी या प्रकरणात २२ फेब्रुवारी २०१३ ला नोटीस काढली आणि सेवानिवृत्तीच्या दोन दिवसपूर्वी २६ फेब्रुवारीला रद्द केली. विद्यमान उपनिबंधकांनी २४ डिसेंबरला २०१४ ला नोटीस काढली आणि ८ जानेवारी २०१५ ती रद्द केली. उपनिबंधकांनी हे प्रकरण सलग दुसऱ्यांदा फाईलबंद केले आहे. मात्र या निर्णयाविरोधात पणन संचालकांकडे अपिल करणार असल्याचे डोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)