संस्थात्मक विलगीकरणासाठी नकार देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:38 AM2021-04-03T04:38:54+5:302021-04-03T04:38:54+5:30
तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवनियुक्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून कठोर निर्बंध लावण्यात आले. याच ...
तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवनियुक्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून कठोर निर्बंध लावण्यात आले. याच पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांना गृह विलगीकरणात न ठेवता त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याची सक्ती जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तालुक्यातील कोरोना बाधित १८ रुग्ण हे गृह विलगीकरणात न राहता गावात व सार्वजनिक ठिकाणी फिरत आहे. ते कोरोना वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे तालुका आरोग्य विभागाच्या लक्षात आले.
आता रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती होण्याचे सांगण्यात आले. हे रुग्ण तालुका आरोग्य प्रशासनाच्या आदेशाला गांभीर्याने घेत नसल्याने अखेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांनी संस्थात्मक विलगीकरणामध्ये भरती न होणाऱ्या या १८ रुग्णांवर गुन्हा दाखल करावा, अशा आशयाचे पत्र महागाव पोलिसांना दिले आहे.
बॉक्स
त्यांना लवकरच भरती करणार
तालुक्यातील कोरोना बाधित १८ रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यासंदर्भात रुग्ण असलेल्या गावच्या आपत्ती व्यवस्थापन समितीला कळविण्यात आले आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती व पोलीस प्रशासनाच्या मदतीने या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले जाईल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांनी सांगितले.