राज्य सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा

By admin | Published: March 31, 2017 02:22 AM2017-03-31T02:22:06+5:302017-03-31T02:22:06+5:30

आर्थिक विवंचनेत अडकलेल्या राज्यातील नऊ हजार शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. याउपरही सरकारला शेतकऱ्याची चिंता नाही.

File a murder case on the state government | राज्य सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा

राज्य सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा

Next

काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांची मागणी : शेतकरी कर्जमुक्तीसाठीच्या संघर्ष यात्रेची जाहीर सभा
यवतमाळ : आर्थिक विवंचनेत अडकलेल्या राज्यातील नऊ हजार शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. याउपरही सरकारला शेतकऱ्याची चिंता नाही. कर्जमाफीसाठी अद्याप योग्यवेळ नसल्याचे सरकार सांगत आहे. आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रतीक्षा सरकार करणार आहे, असा सवाल करीत शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवरच कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा नोंदवावा, असे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
ते यवतमाळातील महात्मा फुले चौकात बुधवारी आयोजित शेतकरी संघर्ष यात्रेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, प्रा. वसंतराव पुरके, अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, गोपालदास अग्रवाल, अबू आझमी, विजय वडेट्टीवार, जोगेंद्र कवाडे, ख्वाजा बेग,संदीप बाजोरीया, यशोमती ठाकूर, मनोहरराव नाईक, माजी आमदार विजय खडसे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांच्यासह अनेक आजी, माजी आमदार उपस्थित होते.
अशोकराव चव्हाण पुढे बोलताना म्हणाले, हे सरकार ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे’ म्हणण्यासोबत गरीबाला मारून टाकणार आहे. आमचे सरकार सर्वांचे विचार जाणून निर्णय घेत होते. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. अशांना धडा शिकवला पाहिजे, असे ते म्हणाले. विरोधकांची ही आघाडी भविष्यातही कायम राहणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
केवळ ‘मन की बात’ चालणार नाही - अजित पवार
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारवर सडकून टीका करताना म्हणाले, सरकार वाट्टेल तसे वागत आहे. ‘हम करे सो कायदा’ यानुसार कायदा व्यवस्था आहे. शेतमालाला भाव नाही. अशा स्थितीत नुसती ‘चाय पे चर्चा’ आणि ‘मनकी बात’ चालणार नाही. या सरकारचे डोळे उघडण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली. सरकारला धडा शिकविल्याखेरीज शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही. कर्जमाफी होईपर्यंत ही यात्रा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरीच युती सरकारला जागा दाखविणार - वडेट्टीवार
आमदार विजय वडेट्टीवार सरकारवर जोरदार प्रहार करताना म्हणाले, शेतकऱ्यांचा बळी सरकारी धोरणाने घेतला आहे. ‘अच्छे दिन’ म्हणत त्यांनी ४०० चे सिलींडर ८०० वर नेले. सोयाबिनला ४५०० रूपयांचा भाव असताना ५४ रूपये किलो असणारे तेल ८४ रूपयांवर गेले. सोयाबीन २६०० वर आले. तुरीचे भाव घसरले. हे सरकार भूलथापा देणारे आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबला, तर शेतकरी तुम्हाला जागा दाखवतील, असा इशारा त्यांनी दिला.
आमदारांचा सभागृहात आवाज दाबण्याचा प्रयत्न - कवाडे
जोगेंद्र कवाडे यांनी दगडाला वाचा फुटेल, पण हे सरकार शेतकऱ्यांना मदत करणार नाही, असा घणाघात केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी करा असे म्हणणे गुन्हा आहे का असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी याच कारणासाठी सरकारने विरोधी १९ आमदारांना निलंबित केल्याचा आरोप केला. आम्हाला सभागृहात बोलू दिले जात नाही म्हणून जनतेपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यशोमती ठाकूर यांनी वदवून घेतल्या घोषणा
आमदार यशोमती ठाकूर यांनी संघर्ष यात्रेत जोश निर्माण केला. उपस्थितांकडून त्यांनी विविध घोषणा वदवून घेतल्या. त्यांनीही सरकारचा खरपूस समाचार घेतला. प्रथम महात्मा फुले यांच्या पुतळयाला सर्वांनी हार अर्पण केले. नंतर कुठलेही सोपस्कार न करता संघर्ष यात्रेच्या मूळ उद्देशाला हात घालत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)

Web Title: File a murder case on the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.