बेंबळाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:25 PM2018-05-25T22:25:28+5:302018-05-25T22:25:28+5:30
बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, येथील टाकळी सम्प आणि जॅकवेल जवळच्या पंपहाऊसला विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. येथील मशनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बेंबळा प्रकल्पातील पाणी यवतमाळात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, येथील टाकळी सम्प आणि जॅकवेल जवळच्या पंपहाऊसला विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण झाले आहे. येथील मशनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. याशिवााय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाणीपुरवठा टॅँकरचे फेरनियोजन केले आहे. दिवसात अधिक फेऱ्या होण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
बेंबळाचे पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यात पोहोचण्याचा विश्वास यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. पिण्यायोग्य पाणी नसले तरी, दैनंदिन वापराकरिता पाणी आणण्याच्या कामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. टाकळी सम्प येथे मशीनरी आली असून जीवन प्राधिकरणच्या इलेक्ट्रीक विंगकडून काम सुरू आहे. त्यासाठी लागणारी केबली पोहोचली आहे. शिवाय यवतमाळ शहरात येणाऱ्या पाईपलाईनचेही काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. ट्रायलमध्ये कोणता अडथळा न आल्यास दहा ते बारा दिवसात पाणी पोहोचविण्याची तयारी केली जात आहे. टाकळी सम्पच्या टाकीचे काम पूर्ण करण्याऐवजी तेथून थेट सम्पमधून पुरवठा सुरू करण्याच्या हालचाली केल्या जात आहे. टंचाईमुळे त्रस्त यवतमाळकरांचा दबाव यंत्रणेवर असल्याने कामाची गती वाढली आहे. त्यामुळे एकदा ट्रायल पूर्ण करून जीवन प्राधिकरण कार्यालयातील सम्पमध्ये पाणी पाहोचविले जाणार आहे. शहरातील अंतर्गत पाईपलाईनचेही काम शेवटच्या टप्प्यात असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
शहरातील टंचाई निवारणासाठी टॅँकरच एकमेव पर्याय आहे. गोखीच्या एमआयडीसी पॉर्इंटवर टॅँकरची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे प्रभागात टॅँकरच्या कमी फेऱ्या होत होत्या. हा गुंता सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शहरात पाच पॉर्इंट तयार केले आहे. तेथून मोठ्या टॅँकरने पाणी पुरविण्याचे नियोजन आहे. पालिकेच्या ६१ टँकरने दिवसभरात ३२० फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. अंतर कमी झाल्याने फेऱ्या वाढल्या असून काटेकोरपणे प्रत्येक घरी किमान पाणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.