ऐतिहासिक विजयस्तंभाची अखेर स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 10:39 PM2019-08-16T22:39:01+5:302019-08-16T22:39:41+5:30
येथील आझाद मैदानातील ऐतिहासिक विजयस्तंभ घाणीच्या विळख्यात सापडला. या विषयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच गुरुदेव युवा संघाने पुढाकार घेत विजयस्तंभाची स्वच्छता केली. या स्तंभाला सजविण्यात आले. तिरंगा ध्वज व खाऊ वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील आझाद मैदानातील ऐतिहासिक विजयस्तंभ घाणीच्या विळख्यात सापडला. या विषयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच गुरुदेव युवा संघाने पुढाकार घेत विजयस्तंभाची स्वच्छता केली. या स्तंभाला सजविण्यात आले. तिरंगा ध्वज व खाऊ वाटप करण्यात आले.
आझाद मैदानातील विजयस्तंभाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र त्याकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. हा संपूर्ण प्रकार संतापजनक आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्य दिनीही या स्तंभाकडे यंत्रणेने दुर्लक्ष केले. परिणामी या परिसरात सर्वत्र घाण दिसून येत होती. विजयस्तंभ घाणीच्या विळख्यात होता. मात्र बेपर्वा यंत्रणचे त्याकडे लक्षच गेले नाही. परिसराची साधी स्वच्छता करण्याची सवड यंत्रणेला मिळाली नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, ‘लोकमत’च्या वृत्तानंतर गुरुदेवा सेवा मंडळाने या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. परिसराला फुगे आणि पताकांनी सजविले. तेथे तिरंगा ध्वज व खाऊचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली.
विजयस्तंभाचा यंत्रणेला विसर
आझाद मैदानाची स्वच्छता व पावित्र्य कायम ठेवण्याची जबाबदारी उपविभागीय कार्यालयाची आहे. संपूर्ण वर्षभर या ठिकाणाची देखभाल करण्याचे काम उपविभागीय कार्यालयाकडे सोपविण्यात आले आहे. मात्र २६ जानेवारी, ९ आॅगस्ट, १५ आॅगस्ट आणि १ मे या ठरावीक दिवसांपूर्वीच या स्तंभाची स्वच्छता केली जाते. यावर्षी तर १५ आॅगस्टपूर्वी या स्तंभाकडे यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले. यंत्रणेला स्तंभाचा विसर पडला. यामुळे अखेर समाजसेवी संघटनेने या भागातील घाण स्वच्छ केली.