अखेर जिल्हा बँकेचे पीक कर्जवाटप पुन्हा सुरू

By admin | Published: May 24, 2016 12:02 AM2016-05-24T00:02:00+5:302016-05-24T00:02:00+5:30

सुमारे २० दिवसांपासून निधी अभावी बंद पडलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पीक कर्ज वाटप अखेर पुन्हा सुरू झाले आहे.

Finally, the bank's crop loan reinstated | अखेर जिल्हा बँकेचे पीक कर्जवाटप पुन्हा सुरू

अखेर जिल्हा बँकेचे पीक कर्जवाटप पुन्हा सुरू

Next

शेतकऱ्यांना दिलासा : स्वनिधीतून ५० कोटींची तरतूद
यवतमाळ : सुमारे २० दिवसांपासून निधी अभावी बंद पडलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पीक कर्ज वाटप अखेर पुन्हा सुरू झाले आहे. राज्य बँकेने पीक कर्जासाठी जिल्हा बँकेला ‘वेटींग’वर ठेवल्याने अखेर जिल्हा बँकेने स्वनिधीतून ५० कोटी रुपयांची तरतूद करीत पीक कर्ज वाटपातील हा तिढा तूर्त सोडविला.
जिल्हा बँकेच्या सर्व ९१ शाखांना पीक कर्ज वाटप सुरू करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सोमवारपासून या वाटपाला प्रारंभही झाला. ४५६ कोटींचे उद्दीष्ट असलेल्या जिल्हा बँकेने १३० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. मात्र पैसा संपल्याने शुक्रवार ६ मेपासून हे पीक कर्ज वाटप बंद पडले होते. जिल्हा बँकेने राज्य बँकेला ३०३ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली. मात्र या मागणीवरून दीड ते दोन महिने लोटत असूनही राज्य बँकेने कर्ज मंजूर केलेले नाही. पर्यायाने जिल्हा बँकेची कोंडी झाली आहे. ऐन हंगाम तोंडावर आला असताना गेल्या २० दिवसांपासून जिल्हा बँकेचे पीक कर्ज वाटप बंद असल्याने हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. चहूबाजूने शेतकऱ्यांकडून बँकेच्या कारभारावर टीका केली जात होती. शेतकऱ्यांप्रमाणेच कर्जाअभावी जिल्हा बँकही आर्थिक कोंडीत सापडली होती. वारंवार संपर्क करूनही राज्य बँकेकडून कर्ज मंजुरीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर आर्थिक कोंडी फोडण्यासाठी जिल्हा बँकेने स्वनिधीतून ५० कोटी रुपये तातडीने पीक कर्ज वाटपासाठी वळविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाची लगेच अंमलबजावणीही सुरू झाली. सर्व ९१ शाखांना पीक कर्ज वाटपाचे आदेश देण्यात आले. मंगळवारपासून बँकेच्या सर्व शाखांमध्ये पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाबार्डने राज्य बँकेला अद्यापही कर्ज मंजूर केले नाही, पर्यायाने राज्य बँकेने जिल्हा बँकेसाठी हात सैल केला नाही. शिखर बँकेकडून कर्ज मंजूर होण्यास आणखी आठवडा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. परंतु पीक कर्जच नसल्यामुळे हातावर हात देऊन बसण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता. बँकेने स्वनिधीतून आर्थिक तरतूद केली नसती तर शेतकऱ्यांवर सावकाराच्या दारीच जाण्याची वेळ होती. मात्र आता शेतकऱ्यांना हक्काच्या जिल्हा बँकेतूनच पीक कर्ज मिळणार आहे.
तातडीने १०० कोटी द्या हो...!
जिल्हा बँकेने राज्य बँकेला ३०३ कोटींच्या कर्जाची मागणी केली असली तरी त्यातून २३० कोटींच्या आसपास कर्ज मंजूर होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीही एवढेच कर्ज मंजूर झाले होते. २३० कोटी मोठी रक्कम असल्याने ती मंजूर होण्यास एक आठवडापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता पाहता जिल्हा बँकेने राज्य बँकेला ‘तातडीने किमान १०० कोटी तरी द्या हो’ अशा शब्दात विनवणी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सत्ताधारी, विरोधकांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले
२० दिवसांपासून जिल्हा बँकेचे पीक कर्ज वाटप बंद आहे. शेतकरी कर्जासाठी बँकेत येरझारा मारतो आहे. मात्र त्याची ही व्यथा सत्ताधारी भाजपा-शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकाऱ्यांनी जाणली नाही. विरोधी पक्ष म्हणून जाब विचारण्याचा अधिकार असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेते-पदाधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांचे हे दु:ख जणू दिसले नाही. पीक कर्ज वाटप बंद का म्हणून विरोधी पक्षाच्या कोणत्याही माजी आमदाराने प्रशासनाला जाब विचारलेला नाही. ज्या शेतकरी मतदारांनी निवडून दिले, त्यांच्या या व्यथेवर शिवसेना-भाजपाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे, प्रशासनाला धारेवर धरल्याचे ऐकिवात नाही. एकूणच आधीच दुष्काळात फसलेल्या या शेतकऱ्यांना सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अक्षरश: वाऱ्यावर सोडल्याचे विदारक चित्र पहायला मिळाले.

शेतकऱ्यांची पीक कर्जाची मागणी लक्षात घेता जिल्हा बँकेने स्वनिधीतून ५० कोटी रुपयांची तातडीचे तरतूद केली आहे. यातून जिल्हा भर पीक कर्ज वाटप सुरू झाले आहे. राज्य बँकेकडून दोन-तीन दिवसात १०० कोटींचे कर्ज मिळण्याची आशा आहे. एकूण ३०३ कोटींच्या कर्जाची मागणी नोंदविली गेली आहे.
- अविनाश सिंघम
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक, यवतमाळ

Web Title: Finally, the bank's crop loan reinstated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.