अखेर ‘वसंत’ भाडेतत्वावर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 09:33 PM2017-11-01T21:33:31+5:302017-11-01T21:33:43+5:30
विदर्भातील एकमेव सहकारी तत्वावर चालणारा पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना आर्थिक डबघाईमुळे अखेर भाडे तत्वावर देण्याचा निर्णय बुधवारी पुसद येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : विदर्भातील एकमेव सहकारी तत्वावर चालणारा पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना आर्थिक डबघाईमुळे अखेर भाडे तत्वावर देण्याचा निर्णय बुधवारी पुसद येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
वसंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी १९६९ साली केली होती. तेव्हापासून अविरत या कारखान्याचे गाळप सुरू आहे. परंतु गत काही वर्षांपासून कारखाना आर्थिक डबघाईस आला. गतवर्षी तर कारखान्याने निच्चांकी २५ हजार मेट्रिक गाळप झाले. यंदा तर अद्यापही गळीत हंगाम सुरू होण्याच्या हालचाली नाहीत. तसेच गत ३० महिन्यांपासून कामगारांच्या वेतनाचे आठ कोटी ६३ लाख रुपये थकीत आहे. कारखान्यावर बँकेचे ३४ कोटी, शासकीय भरणा १० कोटी असे मिळून ७० हजारांपेक्षा अधिक कर्ज आहे. शासनाने थकहमी घेतली नाही. तसेच जिल्हा बँकेनेही पैसे दिले नाही. त्यामुळे कारखाना सुरू झालाच नाही. कारखान्याच्या संदर्भात पुसद येथील विश्रामगृहावर बुधवारी बैठक घेण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष अॅड. माधवराव माने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्वानुमते कारखाना भाडे तत्वावर देण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अॅड. माधवराव माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बैठकीला कारखान्याचे उपाध्यक्ष कृष्णा पाटील देवसरकर, चितांगराव कदम, विलासराव मोरे, रमण रावते, आनंदराव चिकणे, रतीराव राऊत, प्रदीप देशमुख, विजय जाधव, सुभाष जाधव, कल्याणराव माने आदी उपस्थित होते.