अखेर काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
By admin | Published: June 15, 2014 11:46 PM2014-06-15T23:46:55+5:302014-06-15T23:46:55+5:30
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महिनाभराने रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांची चिंतन बैठक पार पडली. त्यात कार्यकर्त्यांचे आक्रमक रुप पाहून अखेर जिल्हाध्यक्षांना पक्षाची जिल्हा कार्यकारिणीच
लोकसभेतील पराभव : चिंतन बैठकीनंतर निर्णय
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महिनाभराने रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांची चिंतन बैठक पार पडली. त्यात कार्यकर्त्यांचे आक्रमक रुप पाहून अखेर जिल्हाध्यक्षांना पक्षाची जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात दुपारी १ वाजता कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला. लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून हा निर्णय घेतल्याचे व तसे पत्र प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात आल्याचे आमदार कासावार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे तर चंद्रपूर मतदारसंघातून सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे अनुक्रमे ९३ हजार आणि साडेतीन लाख मतांनी पराभूत झाले. या पराभवामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते उघडे पडले. नेत्यांनी सामान्य नागरिकच नव्हे तर मतदारांच्या समस्यांकडेही कसे दुर्लक्ष केले, याचा पाढा वाचला गेला.
कार्यकर्त्यातील रोष पाहता तब्बल महिनाभर चिंतन बैठक लांबणीवर टाकली गेली. अखेर रविवारी त्याचा मुहूर्त निघाला. त्यानंतर कार्यकारिणी बरखास्त केली गेली. आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाराज कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत सामावून घेऊन डागडुजीचा प्रयत्न नेत्यांकडून होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)